गेले दोन आठवडे सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या निवडीची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली. ज्येष्ठ भाजप नेते व काका गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालविण्याची माझी इच्छा नाही, पण त्यांचा संघर्षांचा वारसा मी चालविणार असल्याचे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी सभागृहात निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना केले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदावरून वाद होते. दोघांनीही दावा केल्याने निवडीची घोषणा गेले दोन आठवडे होऊ शकली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेत २८ आमदार असून काँग्रेसचे २० आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचा दावा होता. पण विधानसभेत काँग्रेसचे ४२ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ असतानाही त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केला होता. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले, तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावे, असा काँग्रेसचा दबाव होता. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा झाली असली तरी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पटकावणार की राष्ट्रवादी काँग्रेस, हे अजून गुलदस्त्यात आहे. हे पद संख्याबळाच्या आधारे काँग्रेसकडे जावे, असे भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनाही वाटत आहे. पण राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य संबंधितांच्या होणाऱ्या बैठकीनंतर अंतिम निर्णय मंगळवारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसला अजूनही काही दिवस झुलविण्याची खेळी केली जाण्याचीही शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा