स्वच्छ असाल, तर राजीनामे देऊन चौकशीला सामोरे जा; धनंजय मुंडे यांचे आव्हान
भ्रष्टाचारविरोधात आवाज उठवून सत्तेवर आलेल्या भाजपच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील पाच मंत्र्यांवर करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीकडून चौकशीची मागणी केली. स्वच्छ असाल आणि हिंमत असेल तर राजीनामे देऊन चौकशीला सामोरे जावे, असे आव्हान देत मुंडे यांनी दिले.
तूरडाळींसह अन्य डाळींच्या प्रचंड दरवाढीमागे असलेला गरव्यवहार, राष्ट्रपुरुषांच्या छायाचित्रांची व शैक्षणिक पुस्तकांची खरेदी, शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर आधारित कृषिपंप खरेदी, आदिवासी विकास विभागाच्या शिष्यवृत्त्या आणि शेतकऱ्यांना भाडेपट्टय़ाने जमिनी देणे, यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला.
व्यापाऱ्यांचा फायदा
बाजारपेठेत तूरडाळीचे दर वाढत असताना कोणीही मागणी केली नसताना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून कोणतीही कारणे न देता साठय़ावरील र्निबध हटविण्यात आले, असे सांगून मुंडे म्हणाले, त्याचा फायदा उठवून व्यापाऱ्यांनी साडेचार हजार कोटी रुपयांहून अधिक नफा उकळला.
भ्रष्टाचाराचा कळस
महावितरणने शेतकऱ्यांसाठी केलेल्या सौरपंप खरेदीत गुजरातपेक्षा एक ते दोन लाख रुपये अधिक देण्यात आले असून त्यात २०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गरव्यवहार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण गेल्या आठवडय़ात उघड केले होते.
पंतप्रधानांवरही टीकास्त्र
धनंजय मुंडे यांनी या प्रकरणांमध्ये चौकशी आयोग कायद्यानुसार कारवाईची मागणी केली. गिरीश बापट, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, विष्णू सावरा आणि एकनाथ खडसे या पाचही मंत्र्यांनी राजीनामे देण्याची मागणी करताना मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा, भ्रष्टाचारविरोधात भाजपने केलेला प्रचार यावर टीका केली.
छायाचित्र १३९५ रुपयांना
राज्यातील सरकारने भ्रष्टाचाराचा एवढा कळस गाठला की, राष्ट्रपुरुषांच्या छायाचित्रेसुद्धा त्यांनी भ्रष्टाचाराच्या यादीतून सोडली नाहीत. १५ रुपयाला मिळणारी राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे शिक्षण खात्याने चक्क १३९५ रुपयाला खरेदी केली. शिक्षणमंत्र्यांना भ्रष्टाचारासाठी राष्ट्रपुरुषसुद्धा कमी पडावेत, ही अतिशय लज्जास्पद बाब असल्याचे टीकास्त्र मुंडेंनी सोडले.

Story img Loader