शिक्षण आणि रोजगाराच्या मागणीसाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मूकबधिर विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या सरकारचा क्रूर चेहरा समोर आला आहे.या प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
पुण्यातील समाज कल्याण आयुक्त कार्यालयावर शांततामय आणि संसदीय मार्गाने आंदोलन करणाऱ्या, मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार करून त्यांना जखमी करून सरकारने स्वतःच्या ‘बधिर’तेचे लक्षण दाखवून दिले आहे. त्यांच्या जखमांमुळे आता सरकारवर विव्हळण्याची वेळ येणार आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
शिक्षणासाठीच आंदोलन करतायेत ना माझे मूकबधीर बांधव? कुणाचा खुन किंवा चोरी तर नाही केली त्यांनी? राज्यात गुंडांचा सुळसुळाट वाढलाय त्यावर काहीच कारवाई नाही. पण मूकबधीरांवर लाठीचार्ज केला जात आहे? गृहमंत्र्यांनी उद्याच सभागृहात याबाबत स्पष्टीकरण द्यावे. @CMOMaharashtra
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 25, 2019
सन्मानानं जगण्यासाठी रोजगार आणि शिक्षणाचा अधिकार समाजातील मूकबधिर घटकांनाही आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून त्यांनी हे आंदोलन केले. त्यांच्या मागण्या त्यांच्या गावांमध्येच सोडवण्यात आल्या असत्या तर या बांधवांना पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार अशा जिल्ह्याच्या ठिकाणी जावंच लागलं नसतं असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांना पोलीस अमानुषपणे मारत असल्याच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना पोलिसांचं समर्थन करता येणार नाही. पोलीस आणि सरकार म्हणतं की, मूकबधिर विद्यार्थी काय सांगत होते ते आम्हाला कळत नव्हतं आणि आम्ही काय सांगतोय ते त्यांना कळत नव्हतं. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आम्हाला अडचण येत होती, त्यातून हा प्रकार घडला. जर सरकारला जनतेची भाषा समजत नसेल आणि जनतेशी संवाद साधण्यात अडचण येत असेल तर या सरकारनं सत्तेवरुन पायउतार झालेलं चांगलं, असंही धनंजय मुंडे यांनी ऐकवलं आहे.