Dhananjay Munde on Walmik Karad : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर आरोप होत आहेत. वाल्मिक कराडला अटक देखील करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे व वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील आरोप होत आहे. यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे म्हणाले, “हे सगळं खोटं आहे, प्रत्येक गोष्ट खोटी आहे, प्रत्येक आरोप खोटा आहे. माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यापैकी एक तरी आरोप त्यांनी (विरोधकांनी) खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर बोलायचं नाही. सध्या मी त्यावर काही बोलणार नाही. जेव्हा मला त्यावर बोलायचं असेल तेव्हा मी बोलायला कमी पडणार नाही हे तुम्ही सगळेजण जाणता. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्यातील नागरिकाला, या मातीतील माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, “माझी विरोधकांना एवढीच विनंती आहे की ठीक आहे, त्यांना मला बदनाम करायचं असेल तर करावं. आणखी कोणाला बदनाम करायचं असेल तर त्याला देखील बदनाम करा. परंतु, कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, या मातीला बदनाम करू नका. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या वैद्यनाथ नगरीला कोणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका एवढीच माझी विनंती आहे”.
पालकमंत्र्यांच्या यादीतून वगळल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, शनिवारी (१८ जानेवारी) पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचंच नव्हे तर इतर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा त्यांच्यासाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरही मुंडे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडे म्हणाले, “बीड जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता मी स्वतःच अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रfपदाची जबाबदारी अजित पवार यांना द्यावी. दुसऱ्या बाजूला अजित पवारांना देखील विनंती केली की तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारावं. एकूणच पुणे जिल्ह्याचा ज्या पद्धतीने विकास झाला आहे तसाच विकास बीड जिल्ह्याचा देखील व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही अजित पवार यांना विनंती केली की तुम्ही आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद घ्या आणि अजित पवार यांनी देखील या जिल्ह्याची जबाबदारी आता स्वीकारली आहे.