Dhananjay Munde on Anajli Damania : गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांच्यातील उघड वॉर अवघ्या राज्याने पाहिलं. संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराडचा धनंजय मुंडेंशी संबंध असून या प्रकरणी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. या मागणीकरता त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात अनेकविध धक्कादायक खुलासेही केले आहेत. काल (४ फेब्रुवरी) तर त्यांनी दोनवेळा पत्रकार परिषद घेऊन कृषी क्षेत्रातील संबंधित कथित भ्रष्टाचाराचे पुरावेच माध्यमांसमोर सादर केले. एवढं सगळं सुरू असताना आता धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबबात पोस्ट करत हा इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. कृषीसाठी लागणारी उत्पादने चढ्य दरांत विकत घेऊन सरकारी तिजोरीवर ताण आणला असल्याचा दावा यांनी केला. या दाव्यावर धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली. अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत त्यांनी अंजली दमानिया यांना बदनामिया असा उल्लेख केला.

नेमकं प्रकरण काय?

“एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे”, असं म्हणत अंजली दमानिया यांनी थेट लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी पोलखोल केली. या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देतं, त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो”, असा दावा करत अंजली दमानिया यांनी कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा लेखोजाखा त्यांनी आज मांडला. त्यावर धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन सर्व दावे फेटाळून लावले.

“आज ५८ दिवस झाले आहेत माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. हा मीडिया ट्रायल का सुरु आहे? कोण चालवत आहे? हे मला माहिती नाही. आज अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्यामध्ये डीबीटीमध्ये काय असावं? काय नसावं? कोणतीही बाब डीबीटीमधून वगळण्यासाठी कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागत असते. मी कृषीमंत्री असतानाही त्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

धनंजय मुंडेंची पोस्ट काय?

“अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे”, अशी धमकी धनंजय मुंडे यांनी दिली आहे.