वसंत मुंडे
बीड: अपघातानंतर परळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमात सभेच्या ठिकाणी संसदेचे छायाचित्र लावण्यात आल्याने नव्या राजकीय गणितांची चर्चा आता सुरू झाली आहे. या सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘मागील काही दिवसात सार्वजनिक, वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर अनेक संकटे आली. तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवारांसह सहकाऱ्यांनी साथ दिली, जनतेचा विश्वास कायम राहिला. भविष्यात परळीला विचारल्याशिवाय राज्याच्या राजकारणातील घडामोडी होणार नाहीत इतकी शक्ती आहे.
परळीला आणखी काही वेगळे देऊन शहराचे नाव देशात करीन. परळी शहरात रविवारी रात्री राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे अपघातातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच आगमन झाले. गहिनीनाथगड, गोपीनाथगड येथे दर्शन घेऊन शहरात आल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर मोंढा मैदानावर भव्य सभा झाली. या सभेसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरील संसदेच्या छायाचित्राने सर्वाचेच लक्ष वेधले. भाषणात कोणत्याच वक्त्याने संसदेच्या छायाचित्राबाबत किंवा लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले नाही. मात्र आमदार धनंजय मुंडे यांच्या भाषणातील काही संकेत मात्र आगामी राजकीय दिशा स्पष्ट करणारे मानले जात आहेत.
विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सातत्याने संकटांचीच मालिका सुरू झाली. अशाही परिस्थितीत मतदारसंघातील लोकांसाठी घरपोहोच किराणा, औषधोपचार, शेतकऱ्यांचा भाजीपाला या सर्व बाबींवर मदत करण्याचा प्रयत्न केला. ऊस अतिरिक्त राहू नये यासाठी अंबाजोगाईचा साखर कारखाना चालवण्यास घेऊन शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला. ज्यांच्याकडे कारखाना आहे, त्यांनी मात्र तो बंद ठेवला असा टोलाही त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांना लगावला. तर वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक पातळीवर अनेक आरोप झाले, संकटे आली पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह माझे जीवाभावाचे सहकारी आणि जनता खंबीरपणे पाठीमागे उभी राहिली. त्यामुळेच मी आज तुमच्यासमोर उभा आहे.
आयुष्यात २००२ पासून सातत्याने संकटाचा सामना करत इथपर्यंत आलो आहे. इतर कोणताही माणूस कोलमडून पडला असता. आता माझ्याजवळ गमावण्यासारखे काहीच नाही. देशातील शंभर मतदारसंघात परळीचे नाव आणायचे आहे अशी ग्वाही देत भविष्यात परळीला विचारल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडामोडी होऊ शकत नाहीत इतकी शक्ती निर्माण केली आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. स्वागत समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावरील संसदेची प्रतिमा आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणातील देशपातळीवरील उल्लेख यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी धनंजय यांनी तयारी सुरू केली की काय, असे राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत. तर भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनाही पक्षाने राष्ट्रीय सचिव करून मध्य प्रदेशचे सहप्रभारी करत राष्ट्रीय राजकारणात सक्रिय केले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांचीही चर्चा होत असतानाच आता धनंजय यांना राष्ट्रवादी मैदानात उतरवेल का, अशी चर्चा रंगू लागली आहे.