Dhananjay Munde On Anjali Damania: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोप करण्यात येत आहेत. आज अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करत धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. “एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे”, असं म्हणत अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले. दरम्यान, अंजली दमानिया यांच्या आरोपाला आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तसेच अंजली दमानिया या आरोप करून सनसनाटी निर्माण करतात. मात्र, त्यांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे आहेत, सनसनाटी निर्माण करण्याच्या पलिकडे त्या आरोपात काही नाही. पण अंजली दमानिया यांना माझ्यावर आरोप करण्याचं काम ज्यांनी कोणी दिलं असेल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्याबाबत माझं स्पष्ट असं मत आहे की, त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणे यापलिकडे काहीही नाही. मार्च २०२४ मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, त्या निविदा प्रक्रिया सरकारच्या नियमाप्रमाणे राबवण्यात आलेल्या आहेत. मात्र, तरीही गेल्या ५८ दिवसांपासून अंजली दमानिया माझ्यावर वेगवेळे आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दमानिया यांनी असाच एक आरोप केला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की काही आरोपींचा मर्डर झाला. अशा प्रकारचे सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्या आरोप करतात आणि स्वत:ला प्रसिद्धी मिळवतात. यामधून दुसऱ्यांना बदनाम करण्याच्या पलिकडे दुसरं कीहीही नाही”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

‘माझ्यावर मीडिया ट्रायल’

“आज ५८ दिवस झाले आहेत माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. हा मीडिया ट्रायल का सुरु आहे? कोण चालवत आहे? हे मला माहिती नाही. आज अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्यामध्ये डीबीटीमध्ये काय असावं? काय नसावं? कोणतीही बाब डीबीटीमधून वगळण्यासाठी कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागत असते. मी कृषीमंत्री असतानाही त्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

“अंजली दमानिया यांनी एक नॅनो खताचा आरोप केला. नॅनो खताच्या बाबतीत सर्वात जास्त प्रोत्साहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहानंतर महाराष्ट्राने ४ लाख शेतकऱ्यांना नॅनो खत दिलं. नॅनो खताची खरेदी ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कंपनीकडून झाली. नॅनो खताची किंमत आजही काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एकच आहे. त्यापेक्षा कमी दरात आपण हे खत दिलं. नॅनो खतामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होते. त्यामुळे यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. मात्र, मला बदनाम करण्याचं काम दमानिया करत आहेत. त्यांनी याआधीही अनेकांना बदनाम करण्याचं काम घेतलं होतं. आता या एपिसोडमध्ये मी आहे. त्यामुळे मला काही नवल वाटत नाही”, असं प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde on anjali damania accusation and sarpanch santosh deshmukh beed politics gkt