Beed Guardian Minister : पालकमंत्री पदाची यादी आज (१८ जानेवारी) जाहीर करण्यात आली. या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचंच नाही तर इतर दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा त्यांच्यासाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण भोवलं का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात येऊ नये, अशी मागणी बीडमधील सर्वपक्षीय आमदार आणि स्थानिक नेत्यांनी केली होती. याबरोबरच बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी बीडचं पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी स्वत:कडे घ्यावं, अशी मागणी केली होती. यानंतर अखेर आता बीडचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच ‘आपण स्वत:च आपल्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिद नको अशी विनंती केली होती. तसेच मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती’, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया काय?

“बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde on beed guardian minister in ajit pawar and maharashtra guardian minister list mahayuti politics gkt