अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा भाजपाचे ज्येष्ठ नेते, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडत राष्ट्रवादीबरोबर जाण्याच्या निर्णय घेतला होता, याची चर्चा सुरु झाली. पण, गोपीनाथ मुंडे आणि भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय का घेतला? यावर धनंजय मुंडे यांनी भाष्य केलं आहे. ते ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले, “गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडण्याचा निर्णय मी घेतला नाही. ११ जानेवारी २०१२ साली गोपीनाथ मुंडे यांनी भूमिका घेतली की, माझ्या वडिलांचा आणि माझा त्यांच्याशी, कुटुंबाशी आणि भाजपाशी काहीही संबंध नाहीत. मग, मी शरद पवार आणि अजित पवार यांना भेटलो. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.”
हेही वाचा : शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडे म्हणाले, “भाजपा…”
“मला आणि माझ्या वडिलांना बाजूला करण्यात, आम्ही लायक होतो की नालायक या गोष्टी कारणीभूत होत्या. पण, अनेक वर्षे माझ्या वडिलांनी कष्ट घेतले. वयाने मोठे असले तरी नेतृत्व आणि कर्तृत्वामुळे गोपीनाथ मुंडेंसमोर माझे वडील झुकायचे. आम्ही सावलीसारखे बरोबर होतो. आमची राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. पण, असा प्रसंग आल्यानंतर मला हा निर्णय घ्यावा लागला,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
हेही वाचा : “…तर आमचा दुपट्टा तयार आहे”, शिंदे गटातील नेत्याच्या ‘त्या’ दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
“अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातही अशा घटना घडल्या आहेत. इतके वर्षे काम केल्यानंतर ज्या लायकीचे आहोत, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात, तेव्हा निर्णय घ्यावा लागतो,” असेही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.