Dhananjay Munde On Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी पार पडला. यामध्ये भाजपाचे १९ मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे ११ मंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ९ मंत्रिपदे देण्यात आले आहेत. आता कोणते खाते कोणत्या नेत्यांना दिले जाणार? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, असं असलं तरी मंत्रिमंडळात महायुतीमधील अनेक बड्या नेत्यांना संधी देण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळात अनेक माजी मंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जातं. त्यांनी स्वत: देखील याबाबत बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी आता मोठं भाष्य केलं आहे. ‘छगन भुजबळ हे नाराज असतील तर त्यांची नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: दूर करतील’, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
“छगन भुजबळ यांनी जी काही नाराजी माध्यमांसमोर व्यक्त केली. पण मला तर ते नाराज आहेत असं वाटत नाही. कारण ते आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. जर ते नाराज आहेत असं बोलले असतील तर त्यांची नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: दूर करतील”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. दरम्यान, ओबीसी नेते आहेत म्हणून त्यांना डावललं अशी चर्चा आहे, असं विचारलं असता धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, “याबाबतची योग्य ती माहिती मला घेऊ द्या त्यानंतर मी यावर सविस्तर बोलेन.”
दरम्यान, छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. तसेच पक्षातील वरिष्ठांनी व महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले, “मंत्रिमंडळातून मला का काढलं याबाबत मला माहिती नाही. परंतु, सात-आठ दिवसांपूर्वी माझं वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी ते (अजित पवार आणि इतर) मला म्हणाले, तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही. तेव्हा तुम्ही मला सांगितलं की विधानसभेची निवडणूक लढवा. तुम्ही विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघाची निवडणूक जिंकता येणार नाही. तुम्ही लढत असाल तर पक्षाला जोम येईल. पक्ष व कार्यकर्ते राज्यभर जोमाने काम करतील. त्यामुळे तुम्ही लढलंच पाहिजे, असं मला सांगितलं. तुमच्या त्या सल्ल्यानंतर मी विधानसभा निवडणूक लढवली. येवल्यातील जनतेने मला मोठा आशीर्वाद देत निवडून दिलं. आता मी तुमच्या सांगण्यावरून आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाही. तसं केल्यास माझ्या मतदारसंघातील जनतेची प्रतारणा होईल”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.