Dhananjay Munde महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा होत्या. मात्र गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वजनदार खातं असून त्यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी खातेवाटप जाहीर झाल्यानंतर एक महत्त्वाची पोस्ट केली आहे.
धनंजय मुंडे काही दिवसांपासून चर्चेत
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा क्रूर पद्धतीने खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. यानंतर धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड हेच या हत्येचे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र शनिवारी झालेल्या खातेवाटपामध्ये धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर धनंजय मुंडेंनी एक पोस्ट केली आहे.
काय आहे धनंजय मुंडेंची पोस्ट?
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे , उपमुख्यंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार , आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , ज्येष्ठ नेते आदरणीय प्रफुल्ल पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन. असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती ?
अजित पवार- अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क
हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण
धनंजय मुंडे- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
अदिती तटकरे- महिला व बालविकास
माणिकराव कोकाटे- कृषी
बाबासाहेब पाटील- सहकार
नरहरी झिरवाळ- अन्न व औषध प्रशासन
दत्तात्रय भरणे- क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
मकरंद जाधव- मदत आणि पुनर्वसन
अजित पवारांसह ४२ आमदार आले होते. त्यांनी २०२३ मध्ये अजित पवारांसह राहण्याचा निर्णय घेतला. आता या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४१ आमदार निवडून आले आहेत. धनंजय मुंडे यांनी पोस्ट लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.