महाराष्ट्र सरकारच्या दिनदर्शिकेमध्ये महामानवांच्या झालेल्या अवमानाबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरीत करण्यात आलेल्या वर्ष 2019 च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वैभवाचा कसलाही उल्लेख दिनदर्शिकेवर नाही. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दि. 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 28 नोव्हेंबर ही पूर्णतिथी अशा महत्वाच्या घटनांच्या नोंदी-उल्लेख त्या दिवसांच्या रकान्यात नाहीत याबाबत धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या सरकारकडुन वारंवार जाणीवपूर्वक महामानवांचा अवमान होत आहे. यापूर्वीही डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या फोटोत केलेला बदल लोकराज्य मासिकात चुकलेला प्रोटोकॉल अशा अनेक चुका झाल्या आहेत. माहिती व जनसंपर्क विभाग वारंवार चुका करत असतांना कोणावरही कारवाई मात्र केली जात नाही. या सरकारला महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत का?असा सवाल उपस्थित करत या नोंदी-उल्लेख दिनदर्शिकेतून वगळण्याची कारणे काय आहेत, याचा खुलासा शासनाकडून करावा अशी मागणी त्यांनी केली असून याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्रही पाठवले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर महाराष्ट्राचा राज्यकारभार चालणे अपेक्षित असताना नेमका त्यांचाच विसर शासनाला पडणे हे गंभीर व अक्षम्य आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ स्पष्टीकरण करावे व राज्यातील जनतेची माफी मागावी तसेच या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.