Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांंची निर्घुण हत्या करण्यात आली. यामध्ये धनजंय मुंडे यांचे स्नेही वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली जात आहे. आज सभागृहात हा विषय मांडला गेलेला असताना धनंजय मुंडे सभागृहात हजर नव्हते. त्यावरूनही मोठी चर्चा झाली. या सर्व प्रकरणावर अखेर धनंजय मुंडे यांनी मौन सोडलं असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझ्या सहकाऱ्याच्या संबंधात चर्चा सुरू होती, त्यावर उत्तर मुख्यमंत्री देणार होते, त्यामुळे प्रथा परंपरेनुसार मी सदनात उपस्थित राहिलो नाही. मी उपस्थित राहिलो असतं त्यांना उत्तर देताना अडचण झाली असती. त्यामुळे एकदाच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जावं म्हणून मी सभागृहात हजर नव्हतो, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

हेही वाचा >> वाल्मिक कराड अधिवेशन काळात नागपुरातच, विरोधी पक्ष नेत्याच्या दाव्याने खळबळ

“मी सुरुवातीपासून म्हणतोय की हे व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे. अतिशय निर्घृण हत्या संतोष देशमुखांची झाली. या हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही. आता सर्वच आरोपींना अटक झाली आहे. या प्रकरणी आमच्या सर्वांच्या तीव्र भावना होत्या. आता एसआयटी नेमली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास होणार आहे. आदल्यादिवशी गुन्हेगार आणि संतोष देशमुख यांचा भाऊ आणि पोलीस ऑफिसर यांचा चहा पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याचीही चौकशी होणार”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

“माझ्या नावाशी आरोप जोडणं असे प्रकार सदनात अनेकदा घडले आहेत. विरोधी पक्षनेत्याने काय बोलावं हे मी सांगू शकणार नाही. पण अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराड कुठे आहेत हे सांगितलं असतं तर तर त्यालाही अटक केली असते”, असंही ते म्हणाले.

अंबादास दानवे यांनी काय म्हणाले?

या हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड वाल्मिक कराड आहे. तो एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे. मागील दिवस त्याचे नागपूरमध्ये वास्तव्य असताना पोलीस त्याला पकडू का शकले नाही असा सवाल करत आरोपींना राजकीय आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde reaction on santosh deshmukh and valmik karad case sgk