लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून त्यात केंद्रात एनडीएला बहुमत मिळालं. महाराष्ट्रात मात्र महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या. महायुतीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जागा २२ वरून थेट ९ पर्यंत खाली आल्या. त्याती सर्वाधिक चर्चेत राहिलेली जागा म्हणजे बीडची. बऱ्याच चर्चांनंतर उमेदवारी देण्यात आलेल्या पंकजा मुंडे यांचा शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवाने यांनी अवघ्या ६ हजार ५५३ मतांनी पराभव केला. महाराष्ट्रातील हा निकाल चर्चेत असताना पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा थेट राजकीय सामना पाहायला मिळाला. धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षामध्ये. या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये बीडच्या राजकारणावरून कायम अहमहमिका लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भावा-बहिणीच्या नात्यापेक्षाही राजकीय वर्तुळातील कट्टर विरोधक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जायचं. यंदा मात्र अजित पवारांनी भाजपाशी युती केल्यामुळे बीडमध्ये धनंजय मुंडेंना भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार हे निश्चित झालं.
राज्यात महायुती, बीडमध्ये भावा-बहिणींची युती!
दरम्यान, बीडमधून माजी खासदार प्रीतम मुंडे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार अशी अटकळ बांधली जात असताना पंकजा मुंडेंचं नावही चर्चेत येऊ लागलं. २०१९ च्या निवडणुकीतही पंकजा मुंडेंना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यांच्या नाराजीच्या चर्चा आणि राज्यात झालेली महायुती या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी जाहीर झाली आणि धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार हे स्पष्ट झालं.
उर्वरीत महाराष्ट्राप्रमाणेच बीडमध्येही जनमतानं भाजपाच्या विरोधात कौल दिला आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला. या पराभवाची पूर्ण जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचं धनंजय मुंडेंनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
“या पराभवाचं मला दु:ख आहे”
“पंकजा मुंडेंच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. या पराभवाचं मला दु:ख आहे. खंत आहे. बीडच्या जनतेचे मी आभार मानतो की देशात सर्वाधिक मतदान झालेल्या पहिल्या बारा उमेदवारांमध्ये आमच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं. त्यांचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला याचं दु:ख मला आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले.
छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल, “बाळासाहेब आणि तुमचं रक्ताचं नातं, मग तुम्ही..”
दरम्यान, पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यामुळे बीडमधील एका व्यक्तीने दु:खावेगात आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली. त्याचाही धनंजय मुंडेंनी यावेळी उल्लेख केला. “ज्या पद्धतीने पंकजा मुंडेंचा पराभव झाला तो त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या बीडमधल्या काही बांधवांना सहन झाला नाही. त्यांनी आपला जीव समर्पित केला. पण ते फार दु:खदायक आहे. ते आपण थांबवलं पाहिजे. आपला जीव संपवण्यासाठी नाही तर येणारी निवडणूक जिंकण्यासाठी महत्त्वाचं आहे. हा पराभव पचवताना या सगळ्या घटनांमुळे अधिकचं दु:ख आम्हाला होत आहे”, अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी आत्महत्येच्या घटनेवर वेदना व्यक्त केल्या.
“विधानसभेवर आत्ता बोलणार नाही”
“लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचं नुकसान झालं आहे. विधानसभेत चित्र काय असेल ते मी आजच सांगत नाही. येणारा काळ ठरवेल. आज त्यावर बोलणं फार लवकर होईल. तीन महिने जायचे आहेत. तीन महिन्यांनंतर महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना तेव्हा काय असेल, याची चिकित्सा आज होऊ शकत नाही”, असं ते म्हणाले. धनंजय मुंडे स्वत: बीडमधून आमदार असून त्यांच्यासह बीड लोकसभा मतदारसंघातील इतर पाच विधानसभा मतदारसंघांमधली गणितं आता भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या महायुतीतील इतर मित्रपक्षांना जुळवून आणावी लागणार आहेत. पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या मोठ्या आव्हानाचा या भागात महायुतीला सामना करावा लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
बजरंग सोनवानेंनी मानलेले आभार आणि संभ्रम!
दरम्यान, निवडून आलेले उमेदवार बजरंग सोनवानेंनी आपण धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे विशेष आभार मानतो, असं म्हटल्यामुळे त्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर धनंजय मुंडेंनी भाष्य केलं. “निवडून आलेल्या खासदारांनी माझे विशेष आभार माननं म्हणजे त्यांना संभ्रम निर्माण करण्याचा सल्ला कुणीतरी दिला आहे. अशा प्रकारचे आभार त्यांनी मानावेत आणि तेही माझे आणि सुरेश धस यांचे हे न पटणारं आहे. यामागे संभ्रम निर्माण करणं आणि त्यातून वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर भाजून घ्यायची यासंदर्भातलं विधान त्यांचं दिसतंय”, असं धनंजय मुंडे म्हणाले.