Dhananjay Munde On Paralysis Rumors: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये धनंजय मुंडे अनेक वादात सापडले होते. अशात त्यांना बेल्स पाल्सी हा आजार झाल्याचेही समोर आले होते. याची माहिती त्यांनी स्वत: एक्सवर पोस्ट करून दिली होती.
अशात आज राष्ट्रादीतील धनंजय मुंडे यांचे सहकारी आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, धनंजय मुंडे यांना अर्धांगवायू झाल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य धनंजय मुंडे याने फेटाळले असून, त्यांना अर्धांगवायू झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचबरोबर धनंजय मुंडे यांनी त्यांना बेल्स पाल्सी आजार झाल्याचा पुनरूच्चार केला आहे.
मला दीड महिन्यांपूर्वी…
या बाबासाहेब पाटील यांच्या अर्धांगवायू झाल्याच्या विधानावर स्पष्टीकर देताना धनंजय मुंडे यांनी एक्सवर लिहिले की, “आमचे सहकारी, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला दीड महिन्यांपूर्वी बेल्स पाल्सी हा आजार झाला असून, त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.”
मला अर्धांगवायू झाला नाही
आपल्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, “बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. मात्र, मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे. त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होत असून बोलायला त्रास आहे. मात्र, नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही.”
काय म्हणाले होते बाबासाहेब पाटील?
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत एक प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, “तुम्ही आधी हे समजून घ्या की, त्यांची तब्येत ठीक नाही. त्यांना अर्धांगवायू झाला आहे, बोलता येत नाही त्यांचे डोळेही वाकडे झाले आहेत. मात्र, आपण दुसरेच काहीतरी बघतो. ते आमच्या बैठकांसाठी मुंबईला येतात. “