विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची घोषणा होताच परळीसह जिल्ह्यात समर्थक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद साजरा केला. गोपीनाथ मुंडे यांना पहिल्यांदा २३ वर्षांपूर्वी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली. आता जिल्ह्यास दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाल्याने आणखी एक लाल दिवा आला. त्यामुळे जिल्ह्यास दोन लाल दिवे मिळण्याची परंपरा कायम राहिली.
जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे पाच आमदार निवडून आले. परळीत भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे या बहीण-भावात सामना झाला. पंकजा मुंडे विजयी झाल्यानंतर त्यांना ग्रामविकास खात्याचे मंत्रिपद मिळाले. आता विधान परिषदेत राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांची विरोधी पक्षनेतेपदासाठी घोषणा झाली. या निवडीनंतर परळीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटले, तसेच गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद, तर धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपदाचा लाल दिवा मिळाला. राज्यातील प्रत्येक सत्तेच्या वेळी बीडला दोन लाल दिवे मिळण्याची परंपरा आहे. भाजप-शिवसेना युतीच्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री, तर सुरेश नवले राज्यमंत्री होते. शेवटच्या टप्प्यात बदामराव पंडितांनाही संधी मिळाली. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी सरकारमध्ये जयदत्त क्षीरसागर व विमल मुंदडा, तर मागच्या वेळी जयदत्त क्षीरसागर व प्रकाश सोळंके व शेवटच्या टप्प्यात सुरेश धस यांनाही संधी मिळाली होती. या वेळीही दोन लाल दिवे मिळाले, मात्र एक सत्तेतला आणि एक विरोधातला.