काका गोपीनाथ मुंडे यांनी कन्या पंकजा हिला राजकीय वारस म्हणून पुढे आणल्याने नाराज झालेले पुतणे धनंजय यांनी पावणे दोन वर्षांपूर्वीच राष्ट्रवादीशी घरोबा केला असला तरी भाजप आणि आमदारकीचा राजीनामा अलीकडे दिला होता. आता या जागेसाठी २ सप्टेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीत निवडून येऊन धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे अधिकृत आमदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
धनंजय मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेसाठी २ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, २३ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष यांचे संख्याबळ १७०च्या आसपास असल्याने धनंजय मुंडे यांना निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने शिवसेनेच्या किरण पावसकर यांना गळाला लावून पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा विधान परिषदेवर निवडून आणले होते. आता हाच प्रयोग धनंजय मुंडे यांच्याबाबत केला जाणार आहे.
विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यापासून धनंजय मुंडे हे नाराज होते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेरले. भाजपने नंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली तरी त्यांचा राग शांत झाला नव्हता. परळीच्या नगराध्यक्षपदाचे निमित्त झाले आणि धनंजय हे राष्ट्रवादीच्या कळपात चालते झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पुतण्याने काकाला दिलेला धक्का होता. वास्तविक तेव्हाच धनंजय यांचा आमदारकीचा राजीनामा देण्याची राष्ट्रवादीची योजना होती, पण न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही योजना लांबणीवर टाकावी लागली. परिणामी मनाने राष्ट्रवादीबरोबर तर तांत्रिकदृष्टय़ा भाजपचे आमदार म्हणून धनंजय यांना भूमिका पार पाडावी लागत होती.
भाजप धनंजय यांना विरोध करणार का ?
किरण पावसकर यांनी शिवसेना आमदारकीचा राजीनामा देऊन नंतर राष्ट्रवादीच्या वतीने पोटनिवडणूक लढविली होती, तेव्हा शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करून आव्हान दिले होते. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या वतीने पोटनिवडणूक लढविणार असल्याने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करून त्यांना सहज निवडून येणे शक्य होणार नाही या दृष्टीने भाजप प्रयत्न करणार का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
धनंजय मुंडे यांच्या पक्षांतरामुळे भाजपमधील मुंडे विरोधी गट अर्थातच खुशीत आहे.
राष्ट्रवादीला राजकीय लाभ किती ?
धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने बीडच्या राजकारणात राष्ट्रवादीला कितपत फायदा होईल, याबाबत जिल्ह्यातील नेते साशंक आहेत. मुंडे यांना घरातच धक्का दिला एवढा संदेश देण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरला. अर्थात त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांना सहानभुती मिळाली आणि राष्ट्रवादीच्या वतीने लढलेले धनंजय यांचे वडिल भाजपकडून पराभूत झाले होते.

Story img Loader