गणेशोत्सव संपल्यानंतर लागलीच दसरा मेळाव्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदे गटानं याआधीच दसरा मेळावा शिंदे गटाचाच होणार, असा दावा केलेला असताना खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे नेमकी कुणाची शिवसेना खरी? किंवा शिवसेनेचं निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ नेमकं कुणाचं? या प्रश्नांसोबतच दसरा मेळावा नेमका कुणाचा? या प्रश्नावरूनही राजकारण सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
दसरा मेळाव्याचं नेमकं काय आहे राजकारण?
सर्वात आधी शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान मिळण्यासंदर्भात परवानगीचं पत्र पोलिसांकडे गेलं आहे. त्यानंतर शिंदे गटानंही अशा प्रकारे परवानगी मिळण्याचं पत्र दिलं आहे. यासंदर्भात बोलताना “एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरूनच आपण परवानगीसाठी पत्र दिलं”, अशी माहिती एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. त्याामुळे शिंदे गट दसरा मेळावा घेण्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.
दुसरीकडे शिवसेनेकडून सर्व नेतेमंडळी आणि आमदारांसोबतच खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होईल, असा निर्धार बोलून दाखवला आहे. त्यामुळे आता पोलीस नेमकी कुणाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा
या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यावरून सुरू असलेलं राजकारण हा शिंदे गटाकडून राजकीय पोळ्या भाजून घेण्याचा प्रकार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली आज शिरूरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंडेंनी शिंदे सरकारवर तोंडसुख घेतलं.
“…तर यांना भाजपात कुणी स्थान देणार नाही”, किशोरी पेडणेकरांचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला!
“दसरा मेळाव्यासाठी राजकारण होणं, शिवसेना कुणाची या प्रश्नावरून राजकारण होणं, सरकार बदल करणं हे करणारं सरकार जनतेच्या हिताचं नाही. जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर हे सरकार स्थापन झालेलं नाही. जनतेच्या काही मुद्द्यांवर हे आमदार फुटून बाहेर पडले आणि त्यांनी गट केला असं काही झालेलं नाही. यांना जनतेशी काहीही देणं-घेणं नाही. राजकीय पोळ्या भाजून घेण्याचं त्यांचं काम सुरू आहे”, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
तसेच, याआधी झालेल्या सभेमध्ये भाषण करताना “सगळं काही एकदम ओक्के नाहीये, हे यांच्या आता लक्षात आलं आहे”, असा टोलादेखील मुंडेंनी लगावला.