परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे आणि येथील माजी आमदार पंकजा मुंडे यांच्यात राजकीय टोलेबाजी सतत सुरू असते. शनिवारी रात्री परळीतल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार प्रतीम मुंडे यांच्यावर टीका केली आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही मतदारसंघातील एक साधा बायपास रोड झाला नाही. मात्र परळीकरांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो आणि बायपास रोड पूर्ण होताच इथल्या जमिनीचा भाव वाढला. आमदार मुंडे हे जलजीवन मिशन अंतर्गत ब्रह्मवाडी येथे पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले की, “ब्रह्मवाडीमधील, ब्रह्मवाडी शिवारातील तुमच्या जमिनींचे पाच वर्षांपूर्वीचे भाव आणि आत्ताचे भाव यात फरक पडलाय का?” यावर लोक म्हणाले, “हो पडलाय!”, त्यावर मुंडेंनी विचारलं, “किती रुपयांचा फरक पडला आहे?” त्यावर उपस्थितांनी उत्तर दिलं, “एकराला तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त भाव मिळू लागला आहे”. त्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले की, या भागातल्या जमिनींचा भाव प्रति एकर आता तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे.
आमदार मुंडे म्हणाले की, विचार करा, एक बायपास रोड, जो अनेक वर्षांपासून रखडला होता, तो बांधल्यानंतर इथल्या जमिनीच्या किंमती किती वाढल्या. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सर्वत्र त्यांची (भाजपा – पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे) सत्ता होती. सगळीकडे त्यांची सत्ता होती. आमदारकी होती, खासदारकी होती पण मतदार संघात एक बायपास रोड झाला नाही. परंतु प्रभू वैजनाथाच्या कृपने मी आमदार झालो आणि हा बायपास रोड बांधला. मी आमदार होताच इथल्या जमिनीचा भाव वाढला.
हे ही वाचा >> Who killed Atiq Ahmed : पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालून दिल्या घोषणा, पोलीस म्हणाले…
धनंजय मुंडे म्हणाले की, तुमच्या ३० लाखांच्या जमिनी ३ कोटी रुपयांच्या झाल्या. पाच वर्षात कुठे एवढी प्रगती पाहायला मिळाली आहे का? मी निवडणुकीच्या काळात म्हणत होतो, लोकांना रस्ता देणं, रस्त्यावर दिवाबत्ती करणं, घरकूल देणं, सभागृह देणं, पाणीपुरवठा करणं, साफसफाई करणं ही एवढी काम करणे म्हणजे विकास नाही. मी आमदार असेपर्यंत इथल्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे.