पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अधिवशनाचे आयोजन करण्यात आले होते. येथे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शहा यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार हे भ्रष्टाचारांचे म्होरक्या असल्याची घणाघाती टीका त्यांनी केल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तसेच शिवसेना नेत्यांनी शहांवर टीकेची झोड उठवली आहे. अशात अजित पवार गोटातील नेते काय प्रतिक्रिया देतात यावर लक्ष लागून होते. धनंजय मुंडे यांनी अमित शहांच्या टीकेवर आपले मत व्यक्त केले असून त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अधिवेशनात, शरद पवार देशातील राजकारणातील सर्वाधिक भ्रष्टाचारी असून ते भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले. तर महाविकास आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब आहे. त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असल्याची टीका अमित शहा यांनी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतून अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठली. तर अजित पवारांच्या पक्षातील नेतेही त्यावर मत व्यक्त करीत आहेत. धनंजय मुंडे यांनी वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – Hiraman Khoskar : “उमेदवारी मिळाली नाही तर…”, आमदार हिरामण खोसकरांचा काँग्रेसला इशारा
अमित शहा यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, मला याविषयावर आत्ता काही बोलायचे नाही. अमित शहा बोलल्यानंतर यावर मी काही बोलणे योग्य ठरणार नाही. काही तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी फुटण्यापूर्वी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत होते. त्यांनी अनेक वर्षे शरद पवार यांच्याबरोबर काम केले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
आमदार अण्णा बनसोडे यांनीही घेतला आक्षेप
अमित शहा यांच्या शरद पवारांवरील टीकेवर अजित पवार गटाच्या नेत्यानेही नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांचे समर्थक अण्णा बनसोडे यांनी भाजपावर नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते भाजपानेही कबूल केलेले आहे. भाजपाने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शरद पवार हे माझे गुरू आहेत, असे म्हटले होते. यावरून भाजपा नेते अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेले आहे, ते योग्य नाही, अशी नाराजी अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली.