Aaditya Thackeray Slams Devendra Fadnavis : गेल्या महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. याला आता महिना उलटून गेला आहे. तरीही या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे, तसंच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ज्याच्यावर होत आहे, त्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. हा वाल्मिक कराड कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने, विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारीही धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत. आता या प्रकरणावर बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रथमच, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण रोखत आहे? असा प्रश्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

मुख्यमंत्र्यांना कोण अडवत आहे?

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारण्यात आले होते. त्यावर अदित्य ठाकरे म्हणाले, “त्यांना राजीनामा देण्यापासून तसेच मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घेण्यापासून कोण अडवत आहे? मुख्यमंत्र्यांवर काही राजकीय दबाव आहे का? की काही वेगळा युतीधर्म आहे. हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे.”

त्यांना मुख्यमंत्र्यांचे संरक्षण

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सगळे मीडियातून, लोकांच्या बोलण्यातून आणि राजकीय स्तरावर होणाऱ्या चर्चांमधून समोर येत आहे. पण राजीनामा काही घेतला जात नाही. म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांचे पूर्ण संरक्षण आहे.”

दरम्यान यावेळी अदित्य ठाकरे यांनी, हे ईव्हीएम सरकार असल्याचे म्हणत जेवढे भ्रष्ट मंत्री आहेत, त्यांना हे सरकार संरक्षण देत राहिल, असेही म्हटले आहे.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणातील एक वगळता सर्वा आरोपींना पोलिसांनी अटक केलेलं आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा या संतोष देशमुख हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडवर मोकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार आदित्य ठाकेर यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळाचा असल्याने, मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde walmik karad devendra fadnavis aditya thackeray santosh deshmukh murder case aam