राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन, तब्बल पाच कोटी रुपायांची खंडणी मागून ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेस इंदुरमधून अटक करण्यात आली आहे. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“मागील दीड-दोन वर्षांपासून मला हा त्रास सुरू आहे. या पूर्वी देखील त्यांनी एक खोटी तक्रार माझ्याविरोधात केली होती, नंतर ती तक्रार परत वापस घेतली. ज्या काही गोष्टी मागील दीड-दोन वर्षांत झाल्या,ज्या काही मी सहन करत होतो. सगळ्या गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली. तक्रार देत असताना पोलिसांना माझ्याकडून जे काही पुरावे द्यायचे, त्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. आता यात जे काय करायचं ते पोलिसांना करायचं आहे.” असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

मंत्री धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला अखेर इंदूर येथून अटक

मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये धाव घेत सदर महिलेविरुद्ध खंडणी मागीतल्याची आणि ब्लॅकमेलिंग करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली होती. या संबंधी मलबार हील पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हॉट्स अ‍ॅप तसेच फोन करून पैशांची मागणी –

तथाकथित रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती, त्यानंतर काही दिवसातच तिने सदर तक्रार माघारी घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हॉट्स अ‍ॅप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती, यासंदर्भातील सर्व पुरावे पोलिसात दिले असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader