धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी इचलकरंजी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा अन्यथा निवडणुकीत समाजाची ताकद दाखवून देऊ, असा इशारा धनगर समाज आरक्षण कृती समितीने दिला. मोर्चात धनगर समाजाची परंपरा दर्शवणारे गजनृत्य, शेळ्या-मेंढय़ांचाही समावेश असल्याने तो लक्षवेधी ठरला.
राज्यभर विखुरलेल्या धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, अशी मागणी गेली ६० वष्रे समाजाकडून केली जात आहे. मात्र अद्यापही या समाजाला न्याय मिळाला नाही, अशी समाजाची भावना झाली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत नाही. केंद्र शासन आरक्षण देण्यास अनुकूल असले तरी राज्य शासन सकारात्मक भूमिकेत नसल्याने समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीने राज्यभर आंदोलन उभारले आहे. त्याचाच भाग म्हणून इचलकरंजी येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समाजाची परंपरा दर्शवणारे गजनृत्य, शेळ्या-मेंढय़ा आणि धनगरी ढोलाचा निनाद आणि यळकोट-यळकोट जय मल्हार, अशा घोषणा देत श्रीमंत घोरपडे नाटय़गृहापासून सुरू झालेला हा मोर्चा मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर आला. शासन आणि आदिवासी मंत्री धनगर समाजाला जाणीवपूर्वक आरक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप  या वेळी धनगर समाजाचे नेते विठ्ठल चोपडे यांनी केला.
धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या मंत्री महोदयांचा निषेध करून कुरूंदवाडचे नगराध्यक्ष संजय खोत, रामचंद्र डांगे, संदीप कारंडे, नागेश पुजारी, प्रकाश पुजारी, अशोक आरगे, मलकारी लवटे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळावे म्हणून राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच, समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्धारही या वेळी करण्यात आला. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले. आंदोलनात शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील धनगर बांधव सहभागी झाले होते.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा