धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मेंढरांसह भंडा-याची उधळण करत कराड तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता. मुख्यमंत्र्यांच्या गावी निघालेल्या या आक्रमक मोर्चात धनगर समाजाच्या नेत्यांनी इशारे पे इशारे दिल्याने काँग्रेस आघाडीमधील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. विधानसभेच्या तोंडावरच आरक्षणाची मागणी फळास जाईल, अशी खात्री असल्याने धनगर समाज आर या पार च्या लढय़ास उतरला असून, तत्काळ आरक्षण न दिल्यास विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला पराभूत केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूरनाक्यावरील गांधी पुतळय़ापासून मोर्चास प्रारंभ झाला. शेकडो धनगर आपल्या मेंढय़ांसह भंडा-याची उधळण करीत मोर्चात सहभागी झाले. महिलाही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभागी झाल्या होत्या. टी. आर. गराळे, प्रवीण काकडे, भाऊ ढेबे, रमेश लवटे आदी नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोर्चा शाहू चौक, दत्त चौक मार्गे तहसीलदार कचेरीवर येऊन धडकला असता, मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्यांवरून आजवर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण व सवलती मिळाल्याच पाहिजेत अशी मागणी मोर्चेक-यांनी आक्रमकपणे मांडली. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, धर्यशील कदम, रिपाइंच्या नेत्या बनुताई येवले, पंचायत समिती सदस्या अश्विनी लवटे, कराड पालिकेतील विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासो गावडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या पाठिंब्याची भाषणे केली. काँग्रेस आघाडी सरकार निश्चितच धनगर समाजाला न्याय देईल, अशी ग्वाही काँग्रेस नेत्यांनी दिली. तर, धनगर समाजाच्या नेत्यांसह अन्य नेत्यांनी धनगर समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करीत टीकेची झोड उठवली. दरम्यान, टी. आर. गारळे, प्रवीण काकडे आदी नेत्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन सादर केले. भव्य, आक्रमक व दीर्घकाळ चाललेल्या मोर्चामुळे शहर परिसरासह महामार्गावरील वाहतुकीचा बो-या उडाला होता. परिणामी, मोर्चाला बंदोबस्त देताना, वाहतूकही सुरळीत ठेवण्याची कसरत पोलिसांना ऐन पावसात करावी लागली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा