पालकमंत्री मधुकर पिचड, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या निषेधाच्या घोषणा देत धनगर समाजाने अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळण्याची मागणीसाठी मेंढरांसह पारंपरिक वेशात, भंडारा उधळत जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. या मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती, मात्र परवानगी नाकारत कोतवाली पोलिसांनी या समितीच्या सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ७० ते ८० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करून नंतर जामिनावर मुक्तता केली.
समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पिचड यांच्यासह आदिवासी समाजाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. मोर्चात शिवसेनेचे उपनेते आमदार अनिल राठोड हेही सहभागी झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना गुन्हय़ातून वगळले.
राठोड यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या पिचड हे खरे आदिवासी आहेत का याचीच तपासणी केली जावी, अशी मागणी करताना आरक्षण न मिळाल्यास मंत्र्यांना जिल्हय़ात फिरू देणार नाही, असे सांगितले. आरक्षण मिळाले नाहीतर समाजातील पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीनामे देतील असा इशारा ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक निवृत्ती दातीर यांनी दिला. राहुरी बाजार समितीचे संचालक गंगाधर तमनर यांनी ३१ जुलैपर्यंत आरक्षण जाहीर न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. दिगंबर ढवण यांनी शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा जाहीर करताना यापुढे समाज व पक्ष एकत्र आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.
आदिवासी नेत्यांच्या बालिश हट्टापायी धनगर समाजाला सवलतींपासून वंचित ठेवले जात आहे, आदिवासी नेते राज्यातील १०९ मतदारसंघांत ताकद असल्याचा कांगावा करत सरकारला ब्लॅकमेल करत आहे. आदिवासींपेक्षा धनगर समाजाची ताकद जास्त आहे, मात्र कोल्हय़ाकुत्र्यांची टरटर पाहून सरकार नरमाईची भूमिका घेत आहे, आदिवासी नेत्यांनी धनगर समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा समाजाच्या पत्रकात देण्यात आला आहे.
धनगर समाजाचा नगरला मोर्चा
पालकमंत्री मधुकर पिचड, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या निषेधाच्या घोषणा देत धनगर समाजाने अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळण्याची मागणीसाठी मेंढरांसह पारंपरिक वेशात, भंडारा उधळत जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.
First published on: 29-07-2014 at 03:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhangar community march in nagar