प्रणव पाटील
सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर, पठारी भागात, कातळ सड्यावर, तर कुठे उतारावर डोंगरी धनगरांचा अधिवास आहे. दुर्गम भागात असणाऱ्या या धनगरांचा मुख्य व्यवसाय हा गायी, म्हशी आणि काही ठिकाणी बकऱ्या पाळण्याचा आहे. बदलत्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिस्थितीत हा अधिवास धोक्यात आला आहे. अभ्यासकांच्या मते साधारण १५०० सालापासून पठारी आणि मैदानी भागातून पशुपालक हे डोंगर माथ्याकडे सरकले. त्यांचे हे स्थलांतर पाण्यासाठी आणि गुरांच्या चाऱ्यासाठी असावे. त्यामुळे जास्त पावसाच्या प्रदेशात गेलेल्या धनगरांनी प्रामुख्याने म्हशी पाळायला सुरुवात केली. दुसरीकडे कमी पावसाच्या प्रदेशातले धनगर शेळ्या-मेंढयांचे कळप घेऊन अर्धभटके जीवन जगू लागले. या बदलामुळे या धनगरांमध्ये डोंगरी धनगर आणि मेंढे (मेंढ्या पाळणारे) असा भेद तयार होऊन नवीन उपजात तयार झाली. असे असले तरी डोंगरी प्रदेशातल्या काही धनगरांना त्यांच्या सपाटीवरच्या मूळ गावाविषयीची माहिती आहे. स्थलांतराचा हा मौखिक इतिहास जिवंत राहिला तो त्यांच्या दैवतांमुळे. आपल्या मूळ ठिकाणी असलेल्या दैवतांच्या मंदिरांना काही धनगर वर्षातून एकदा भेट देतात. परंतु घाटमाध्यावरून कोकणात गेलेल्या धनगरांना मात्र त्यांच्या या स्थलांतराचे सर्व टप्पे माहित नाहीत. त्यांना घाटमाथ्यावरच्या शेवटच्या स्थलांतराच्या ठिकाणाची माहिती असते.
सर्वसाधारणपणे दमट पानझडी वृक्षांच्या प्रदेशात २० म्हशी असलेल्या कळपाला १ चौरस किलोमीटर चराऊ जमीन लागते. यामुळे या धनगरांनी सह्याद्रीत वस्ती करताना लहान लहान गटांनी वस्ती केलेली दिसते. पाण्यासाठी झऱ्यावर अवलंबून असलेल्या या धनगरांना एकाच ठिकाणी जास्त वस्ती केल्यास पाण्याची मोठी चणचण भासते. त्यामुळे उन्हाळ्यात चिपळूण परिसरातले धनगर डोंगर माथ्यावरून चार पाच महिने गावात येऊन एखाद्या शेतात वस्ती करतात. गेल्या ६०-७० वर्षात पाणी आणि चाऱ्याच्या शोधात सातारच्या पाटण खोऱ्यातून आणि कोल्हापूर भागातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. हे स्थलांतर कर्नाटकातील बेळगाव, कारवार, शिवमोग्गापर्यंत झाले आहे. काही ठिकाणच्या मूळ धनगरवाड्यातून ७०% लोक कर्नाटकात गेले आहेत. कर्नाटकातल्या जंगलामध्ये थोडीफार जागा साफसूफ करून त्यांनी लहान-लहान गावे वसवली आहेत. सन १९५३ सालच्या मुंबई प्रांताच्या अधिवेशनात या स्थलांतरावर चर्चा झाली होती. दुसरीकडे सह्याद्रीच्या पलीकडे कोकणात मोठ्या संख्येने हे धनगर पूर्वीच स्थलांतरित झाले आहेत.
मधल्या काळात नव्याने झालेल्या धरणांमुळे धनगर एक तर विस्थापित झाले किंवा आणखी आत डोंगरमाथ्याकडे सरकले आहेत. परंतु या सगळ्यापेक्षा वनखात्याच्या चुकीच्या पद्धतीच्या धोरणांमुळे त्यांचा पशुपालन हा व्यवसायच अडचणीत आला आहे. चंदगड परिसरातले धनगर सांगतात की मोकळ्या जागी जिथे गवताची कुरणे होती तिथे नव्याने वनीकरण केल्यामुळे गुरांना चाऱ्यासाठी असणारी जागा संपली आहे. जिथे धनगर वस्तीच्या खाली आणि वर वनखाते आहे, तिथे हे पशुपालक कात्रीत सापडले आहेत. थोड्याफार मोबदल्यासाठी वनखात्यातील काही जण या लोकांना हुसकावून लावू इच्छित आहे. दुसरीकडे अभयारण्याचा दर्जा दिल्याने मिळालेले संरक्षण, वनीकरण, अशा वेगवेगळ्या प्रयत्नांमुळे जंगलातील काही प्रजातींच्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. तसेच, मांसभक्षी प्राण्यांचे जंगलातील नैसर्गिक अन्नही अनिर्बंध शिकारीसारख्या कृत्यांमुळे कमी होत आहे. त्यामुळे वर्षाकाठी कुठे बिबट्याने एखादी बकरी, गायीचे वासरु मारल्याची घटना घडायची, ती आता दर महिन्याला होऊ लागली आहे. त्यात वनखाते अशा घटनेत पशुपालकांना थोडीफार भरपाई देते, परंतु त्याची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ आहे. यात मेख अशी आहे की मृत जनावरांचे अवशेष जंगली प्राण्यांनी खाऊन संपवले असले तर मात्र भरपाई मिळत नाही.
संगमेश्वर आणि चिपळूण परिसरातले धनगर सांगतात घाटावरच्या जंगलात प्राण्यांची संख्या वाढल्यामुळे हे प्राणी खाली उतरले आहेत. कोळसुंदा नावाचा प्राणी या पूर्वी या लोकांनी पहिलाही नव्हता, परंतु आता या प्राण्याची इतकी दहशत आहे की बकऱ्या मुक्तपणे डोंगरात फिरु शकत नाहीत. इथेही कोळसुंद्याचे नैसर्गिक भक्ष्य पुरेशा संख्येने उपलब्ध नसल्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे हळूहळू या धनगरांनी पशुपालन कमी करीत आणले आहे. काही ठिकाणी घरच्या दुधापुरत्या म्हशी राहिल्या आहेत. अनेक ठिकाणी डोंगर उतारावर हे धनगर नाचणी, वरई, तांदळाची शेती करतात. गेल्या काही वर्षात रानडुक्कर, गवा, नीलगाय यांच्यामुळे ही शेतीही धोक्यात आली आहे. वरील वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे कुरणे व जंगले हेही विखंडीत स्वरुपात शिल्लक राहिल्याने त्यांचा मनुष्य वस्ती व शेतीकडे वळण्याचा कल वाढतो आहे. अनेक ठिकाणी धनगर पशुपालकांनी शेती करायचे सोडून दिले आहे.
नव्हेंबर ते जानेवारी दरम्यान हत्तींच्या स्थलांतरणात दोडामार्ग, चंदगड परिसरातल्या शेतांमध्ये हत्ती शिरून वर्षभर पिकविलेली शेती उध्वस्त करतात, तेव्हा कुठे दाद मागायची असा प्रश्न पडतो. ‘तुमची जमीन वनहक्कातली जमीन आहे,’ असे म्हणून वनखाते भरपाई देत नाही असे चंदगडचे धनगर सांगतात. कधीकाळी जंगलातल्या वनौषधींची माहिती असणारे धनगर भेटायचे, परंतु आता जंगलात जाण्याचीच चोरी झाल्यामुळे नवीन पिढी शहराकडे स्थलांतरित होताना दिसते. दुसरीकडे गावातील शेतकरी आणि पशुपालकांच्यात वाढलेल्या तणावामुळे रस्ते, पाणी, गायरान जमिनी या मुद्द्यांवरून संघर्ष वाढत आहे. एकीकडे बदलते पर्यावरण, तर दुसरीकडे बदलती सामाजिक स्थिती यामुळे धनगरांचा पशुपालन हा व्यवसाय अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे.
(लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे पाठ्यवृत्तीधारक आहेत. २१ मार्च आंतरराष्ट्रीय वनदिनाच्या औचित्याने हा लेख लिहिला आहे.)