गेंड्याच्या कातडीचे भाजप सरकार मला दिलेल्या आसूडाने नीट होईल का? अशी शंका माझ्या मनात हा आसूड दिल्यानंतर निर्माण झाली आहे अशा शब्दात सरकारची खिल्ली उडवत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर धारदार शब्दांचा आसूड ओढला. घोटी येथे धनंजय मुंडे यांना आसूड भेट देण्यात आला त्यावेळी धनंजय मुंडे यांनी हाच धागा पकडून सरकारवर टीका केली.
साडेचार वर्षांत प्रत्येकाच्या खिशातून दीड लाखांची लूट केली परंतु चौकीदाराने तुम्हाला त्याची भनक लागू दिली नाही. नोकरी देतो सांगून तरुणाईला फसवलं आणि जीेसटीमधून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले… नोटाबंदीने या देशाचे आर्थिक कंबरडं मोडलं यातून आजही देशातील जनता सावरलेली नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले. राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी केली परंतु अशी कर्जमाफी दिली की लोकांचे सातबाराच जातात की अशी भीती वाटली असेही धनंजय मुंडे म्हणाले.
कसली पारदर्शकता आहे तुमच्यात. रोज उठून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कशाला दाखवता पारदर्शकता असा सवालही केला. या युतीला खडयात घातल्याशिवाय या राज्यातील जनता स्वस्त बसणार नाही असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला. बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च केले जाणार आहे. समृध्दी महामार्गामध्ये शेतकर्यांना नाडले गेले तर या शेतकऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे पाठीशी उभी राहिल असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.
नाशिकचा नावलौकिक आदरणीय छगन भुजबळ साहेबांमुळे झाले आहे. अडीच वर्षे भुजबळ साहेबांना छळलं आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण केले गेले नाही असे सांगताना छगन भुजबळ दिल्लीपासून राज्यातील भाजप नेत्यांना पुरून उरतील कारण राष्ट्रवादीचे सैन्य त्यांच्यासोबत आहे. आम्ही मेलेल्या आईचे दुध प्यायलेलो नाही सर्व शक्तीनिशी पुरुन ऊरु असा इशाराही धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत शेवटी दिला.