शिवसेना पक्षातील अंतर्गत कलहामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. हे सत्तापालट झाल्यानंतर देखील शिवसेनेतील अंतर्गत कलह अद्याप कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना पक्षात दोन गट पडल्यामुळे मूळ शिवसेना कुणाची? आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाचं? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता हा वाद न्यायालयात गेला आहे. आमच्याकडे ४० आमदार असून आमचं संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आम्हाला मिळावं अशी मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. तर शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा- “भाजपामध्ये महिलांना मान-सन्मान मिळत नाही”, BJP जिल्हाध्यक्षांचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर यशोमती ठाकूर यांचं टीकास्त्र!

शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू असताना सामाजिक न्याय आणि विकास मंत्री रामदास आठवले यांनी या वादात उडी घेतली आहे. धनुष्यबाण कुणाला द्यायला हवं? असा प्रश्न एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारला असता आठवले यांनी संख्याबळाच्या आधारावर उत्तर दिलं आहे. “एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदार आहेत. त्यामुळे धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना द्यावं आणि राहिलेलं त्यांनी घ्यावं,” असा खोचक सल्ला आठवले यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanushyaban should get eknath shinde rpi chief ramdas athwale statement shivsena internal dispute rmm