शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव सध्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. भास्कर जाधव भाजपात जाणार असल्याचे दावेदेखील केले जात आहेत. हे सर्व दावे फेटाळून लावत भास्कर जाधव यांनी ते उद्धव ठाकरेंबरोबरच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, चिपळूणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षपणे त्यांची नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी भास्कर जाधव हेही बॅग भरून गुवाहाटीला येण्यासाठी तयार होते, आम्ही त्यांना विरोध केला, असा दावा केला होता. हा दावा फेटाळून लावताना भास्कर जाधव यांनी आपण उद्धव ठाकरेंबरोबरच आहोत आणि यापुढेही ठाकरे गटात राहणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, काही पदांवर हक्क असून असून ती मिळाली नाहीत तरी कधी नाराजी बोलून दाखवली नाही, असंही भास्कर जाधव भर सभेत बोलले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भास्कर जाधव म्हणाले, उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर मला त्यात काहीही मिळणार नाहीये. मी त्यासाठी लढतच नाहीये. ज्याची अपेक्षाच मी केलेली नाही तर ते न मिळाल्याचं दु:ख मला का होईल? २०१९ साली मला मंत्री करायला हवं होतं. पक्षातील आमदारांमध्ये सगळ्यात वरीष्ठ मीच होतो. पण मी एकदाही माझ्या भाषणांमध्ये त्याचा उल्लेख केला नाही. मी एकाच मुलाखतीत एकच वाक्य म्हणालो की माझा हक्क होता, मला मिळायला हवं होतं. माझ्यावर अन्याय झाला. पण मी यत्किंचितही नाराज नाही. त्यानंतर कधीही मी हा मुद्दा उपस्थित केला नाही. पक्ष फुटला, तेव्हा गटनेता बदलायची वेळ आली होती. विधानसभेत माझा आवाज होता. पण पक्षानं मला गटनेता केलं नाही. म्हणून मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही.

हे ही वाचा >> महायुतीत वादाची ठिणगी? अमोल मिटकरी एकनाथ शिंदेंना म्हणाले, “शिवतारेंना आवरा, अन्यथा…”

दरम्यान, भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा चालू असताना ते आपल्या पक्षात यावेत यासाठी इतर पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत, असं चित्र पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भास्कर जाधव यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) प्रवेशाच्या चर्चेवर प्रश्न विचारला. त्यावर आत्राम म्हणाले, आमच्या पक्षात जे-जे नेते येतील त्यांचं आम्ही स्वागत करू. आमच्याकडे चांगलं संख्याबळ आहे. परंतु, आमचं संख्याबळ आणखी वाढत असेल तर आम्ही जरूर त्यांचं स्वागत करू. ते (भास्कर जाधव) पूर्वी आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळी दोन ते तीन वेळा त्यांचा गडचिरोली दौरा झाला होता. ते येणार असतील तर चांगली गोष्ट आहे. एक चांगली व्यक्ती आमच्या पक्षात आली तर आम्ही त्यांचं स्वागत करू.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharamraobaba aatram says if bhaskar jadhav joins ncp will welcome him asc
Show comments