भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचीही निर्मिती झाली. त्यामुळे सीमाभागातील जवळपास सर्वच कुटुंबीयांचे नातेवाईक दोन देशांमध्ये विभागले गेले. पण याचसोबत इतर सर्वच बाबींचेही पत्ते बदलले! ज्या गोष्टी तोपर्यंत भारतात होत्या, त्यांच्या पत्त्यांवर पाकिस्तान नाव लागलं. महाराष्ट्रातल्या धाराशिवमधील (पूर्वीच्या उस्मानाबाद) हिंगळज देवीच्या मूळ स्थानाचाही पत्ता फाळणीनंतर बदलला! हिंगळज देवीचं मूळ स्थान पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंगळजवाडीत देवीच्या प्रकटदिनाचा उत्साह!

धाराशिवच्या हिंगळजवाडीत सध्या देवीच्या प्रकटदिनाचा उत्साह दिसून येत आहे. यानिमित्त हिंगळजवाडीत वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. हा प्रकटदिन म्हणजे चैत्र वैद्य अष्टमी. आदल्या दिवशी रात्री मोठ्या दिमाखात देवीचा छबीना निघतो. देवीच्या दर्शनासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही, तर इतर राज्यांमधूनही भाविक दरवर्षी येत असतात.

काय आहे आख्यायिका?

देवीच्या प्रकटदिनाचीही अनोखी आख्यायिका सांगितली जाते. मंदिराचे मुख्य पुजारी राम सुतार यांनी सांगितलेल्या आख्यायिकेनुसार, प्रकटदिनाची ही परंपरा वर्षानुवर्षं चालत आलेली आहे. देवीचं मूळ पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये आहे. पूर्वी इथे आसपास परिसर जंगलमय होता. आत्ताच्या दत्तमंदिराच्या जागी एक राजा राज्य करत होता. काही साधूसंत फिरत फिरत जंगलात आले आणि तिथे शिवलिंग स्थापन करून ते त्याची पूजा करत होते. राजाला हे कळल्यानंतर त्याने सेवक पाठवून साधूंना राजवाड्यात येऊन काही दिवस राहण्याची विनंती केली. साधूच्या कथा-कीर्तनानं राजाचं मनपरिवर्तन झालं आणि राजा सगळं वैभव त्यागून निघून गेला. नंतर साधूंनी दत्ताची मूर्ती तिथे स्थापन केली. ते दत्तमंदिर म्हणून आता प्रसिद्ध आहे.

देवीचा प्रकटदिन…

“त्या काळी त्या साधूंमधील एक महंत दररोज गुरू झोपल्यानंतर पाकिस्तानमध्ये पक्ष्याच्या रुपात वगैरे देवीच्या दर्शनाला जायचे आणि गुरू सकाळी उठण्याच्या आधी ते परत यायचे. असेच बरेच दिवस लोटल्यानंतर देवीनं एक दिवस त्यांना दृष्टांत दिला की तू दररोज इथे यायची गरज नाही. तुझ्यामागून मी तुझ्या गावापर्यंत येते. पण एक अट आहे की तू जिथे पाठीमागे फिरून बघशील, तिथे मी थांबेन. साधू दत्तमंदिरात पोहोचल्यावर खात्रीपोटी त्यांनी मागे वळून बघितलं तर देवी पाठीमागे होती. त्यामुळे देवी इथेच राहिली. तो दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो”, अशी माहिती राम सुतार यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharaship hinglaj devi mandir yatra original in pakistan baluchistan rno news pmw