धाराशिव जिल्ह्यात वर्षातील सर्वाधिक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे धाराशिव सोलार प्रकल्पासाठी राज्यात सर्वात अनुकूल जिल्हा आहे. त्यामुळे ३०० मेगावॅट क्षमतेचे सोलर प्रकल्प उभारणीसाठी तब्बल १३५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी देशभरातील नामवंत कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. यातून रोजगार निर्मितीलाही मोठी चालना मिळणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या सोलार प्रकल्पाबाबत मंदिर समितीच्या कार्यालयात देशातील नामवंत कंपन्यांनी सादरीकरण केले असल्याची माहिती समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ तथा महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ख्याती असलेल्या आई तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि शेकडो वर्षांपासून तुळजाभवानी देवीच्या मंदिरात वेगवेगळ्या सेवा रुजू करणाऱ्या मठाच्या शाश्वत उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या जागेवर सोलार प्रकल्प उभारण्याबाबत ठराव संमत करण्यात आला होता. सोलार प्रकल्प उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या देशभरातील नामांकीत कंपन्यांकडून सादरीकरणासाठी प्रस्तावही मागविण्यात आले होते. मंदिर समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील इच्छुक असणाऱ्या दहा कंपन्यांनी उत्स्फूर्तपणे सोलार प्रकल्प उभारण्यासाठी तयारी दर्शवली आहे. शुक्रवारी या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच विविध मठांच्या जमिनीवर कशा पद्धतीने सोलार प्रकल्प साकारला जाणार याबाबतचे वस्तुनिष्ठ सादरीकरण केले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
मोदींजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जानिर्मितीच्या धोरणाला पूरक भूमिका घेत मंदिर समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रिलायन्स, जुनीपर, जेएसडब्यु, सॉलीटिस, एनएचपीसी, टीयूव्ही यासारख्या नामांकीत कंपन्यांनी शुक्रवारी मंदिर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सादरीकरणात सहभाग घेतला. मंदिर संस्थानकडे जवळपास १५०० एकर जमीन उपलब्ध आहे. या जागेवर ३०० मेगावॅट क्षमतेचे सोलार प्रकल्प उभे केले जाऊ शकतात. त्यातून तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच विविध मठांना आर्थिक उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध होणार आहे. या सादरीकरणात अनेक महत्त्वाच्या बाजूची इत्थंभूत माहितीही सादर करण्यात आली. मंदिर संस्थानच्या मालकीची आणि मठांच्या ताब्यात असलेली ही १५०० एकर जमीन सोलार प्रकल्प उभारण्यासाठी भाड्याने देणे संयुक्तिक राहील काय? सोलार प्रकल्पाच्या उभारणीनंतर एकूण उत्पन्नातील हिस्सा घेणे अथवा प्रकल्पामध्ये अंशत: गुंतवणूक करणे आवश्यक आहे काय? आदी महत्वपूर्ण बाबींवर मंदिर समिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत चर्चा झाली.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याबाबतही चर्चा झाली असून त्यानुसार पुढील कामाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि परिसर धार्मिक पर्यटनाचे राष्ट्रीय केंद्र म्हणून नावारूपाला यावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या महत्वाच्या बैठकीसही ऑनलाईन उपस्थित राहून सर्व बाबी नीट समजून घेतल्या तसेच दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने काही महत्वच्या सूचनाही यावेळी मांडल्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मंदिर संस्थानच्या तहसीलदार माया माने, तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह विविध दहा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा – Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”
या प्रकल्पात तब्बल रु. १३५० कोटींची गुंतवणूक व त्यातून ५०० हुन अधिक रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. सौर व पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आपण नियोजन केले आहे. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य विकासाचे अल्प कालावधीचे कोर्स चालू करण्यात येणार आहेत. मोदींजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार व देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या पूरक धोरणानुसार राज्यासह धाराशिव जिल्ह्यात सौर व पवनऊर्जा या अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील नामांकित उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याने प्रचंड रोजगारनिर्मिती होणार असल्याने स्थानिक युवकांना याबाबतचे प्रशिक्षण आपल्या परिसरतच उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.