बिपिन देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धाराशीव

गोदावरी आणि कृष्णा या दोन खोऱ्यांची शीव म्हणून नाव धाराशीव. नावात नुकतेच बदलही झाले पण विकास मात्र मागच्या बाकावर राहिला. नीती आयोगाच्या मागास जिल्ह्याच्या यादीनुसार निर्देशांक वाढवून शैक्षणिक, आरोग्य सुविधा निर्माणासोबतच विकासाच्या योजना राबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलेल्या या जिल्ह्यात बरेच प्रकल्प आखलेले. पण सारी प्रक्रिया ‘काम चालू रस्ता बंद’ अशीच राहिल्याने धाराशीवला विकासाची वेस अद्याप गाठता आलेली नाही.

 ‘उस्मानाबाद’ची ओळख पूर्वी ‘हवा, पाणी आणि तुळजाभवानी’ अशीच होती. आजही त्यात सर्वागीण विकासाच्या अंगाने फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. शिक्षणाच्या दृष्टीने येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. वैद्यकीय महाविद्यालय गतवर्षीच मंजूर झाले आणि त्यातून प्रथम वर्षांचे शिक्षण पूर्ण करून एक तुकडीही पुढच्या वर्गात सरकते आहे. एक शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, परिचर्या (नर्सिग) महाविद्यालय शासकीय व इतर काही खासगी स्वरूपातली आहेत. विधि, अभियांत्रिकी महाविद्यालयांसह अनेक उच्च शिक्षणाच्या संस्था येथे आहेत. शिक्षणासाठी उस्मानाबादमधूनच वेगळा झालेल्या लातूरशी स्पर्धा मनात असते. पण पुढे काही सरकत नाही. जिल्ह्यात एकूण १ हजार ८६ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यामधून १ लाख २३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी ४ हजार ८५० च्या आसपास शिक्षक आहेत.

इतिहासात जिल्ह्यातील तेरची ख्याती अगदी रोमपर्यंत. परंडय़ाचा माणकेश्वर येथील मंदिर, नळदुर्गच्या किल्ल्यातील नर- मादी धबधबा, परंडय़ाचा किल्ला, धाराशीवची लेणी अशा किती तरी पर्यटनपूरक वास्तू. पण सारे काही दुर्लक्षित. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांत जिल्हा तसा मागासच. एक जिल्हा रुग्णालय व एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. ४४ प्राथमिक केंद्रांतर्गत २५६ आरोग्य उपकेंद्रे आहेत पण गंभीर आजार झाला की सोलापूरला तज्ज्ञ डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. रस्त्यांच्या कामांमुळे दळणवळणातील अडथळे दूर  झाले आहेत. औरंगाबाद-सोलापूर रस्ता पूर्णपणे तयार असल्याचा फायदा वाहतुकीला होतोच; पण आरोग्य सेवेअभावी सोलापूरची वाट धरणाऱ्या रुग्णांनाही वेळेत उपचार मिळण्यास मदत मिळते. 

रेल्वे दशकभरापूर्वी सुरू झालेली असली तरी अद्याप धाराशीव-तुळजापूर-सोलापूर हा अवघा ५५-६० किमीचा मार्ग पूर्णत्वास येऊ शकला नाही. या मार्गासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे सांगातात. आता सुरत-चेन्नई हा रस्ताही धाराशीवमधून जात आहे. नागपूर-तुळजापूर-रत्नागिरी हा महामार्गही आहे. हैदराबाद-पुणे हाही एक महामार्गही आहे. हैदराबाद ही मोठी बाजारपेठ असल्याने त्याचा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनीही त्याचा फायदा घेण्यासारखी अनुकूल परिस्थिती आहे.

ऊस, ज्वारी, गहू, आंबा, कापूस ही मुख्य पिके. तेरणा, मांजरा या मुख्य नद्यांसह बोरी, बाणगंगा, मन्याज, तावरजा या उपनद्या वाहत असल्या तरी अवर्षणग्रस्त ही ओळख कायम आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे काही प्रयोग झाले आणि फसले. द्राक्ष, केशर आंबा उत्पादनातून नवे काही प्रयोग करून निर्यातही करतात काही जिगरबाज शेतकरी. त्यामुळे प्रगतीच्या वाटेवर पण अर्धवट अवस्थेत, असेच चित्र दिसून येत आहे. अलीकडेच एका शेतकऱ्याला ४० क्विंटल कांदा विक्री करूनही ८०० रुपये पदरचेच द्यावे लागण्याची वेळ आली. त्यातून शेतकऱ्यांची शोकांतिका लक्षात येते. तसा जिल्हा नेहमी तापलेला. ३६५ पैकी ३५० पेक्षा अधिक दिवस येथे स्वच्छ सूर्यप्रकाश. त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पासाठी अनुकूल भूमी. आता टेक्निकल टेक्सास्टाईल पार्क आणले जात असून त्याद्वारे पीपीई किट, वैद्यकीय, औषध निर्माणासाठी आवश्यक कपडे तयार करण्याचे कारखाने यावेत असे प्रयत्न केले जात आहेत. आकांक्षित योजनेंतर्गत निर्देशांक वाढवण्यासाठी काही योजना आखल्या आहेत. त्यात निश्चितच काही प्रमाणात चांगले कामही झाले आहे. त्यासाठी ३ कोटींचे केंद्रस्तरावरील पारितोषिक जिल्ह्याने पटकावले आहे. उस्मानाबादचे धाराशीव नामकरण करताना त्यामागे ठाम राजकीय इच्छाशक्ती दिसून आली. तशीच इच्छाशक्ती या जिल्ह्याच्या पायाभूत विकासासाठीही दाखवल्यास धाराशीवचे नाव राज्याच्या विकासवाटेवर अधिक ठळक दिसेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharashiv district information lack of development in dharashiv district zws
Show comments