छत्रपती संभाजीनगर : कृष्णा आणि गोदावरी दोन धारांची शीव म्हणजे धाराशिव. पण, दोन्ही बाजूने आलेल्या कोरडेपणामुळे धाराशिवची प्रगती तशी खुंटलेली. सिंचनाच्या सोयी नसल्याने दरडोई उत्पन्न घटलेले. पण, गेल्या काही वर्षांत शिक्षणातील गुणवत्तेकडे लक्ष दिल्याने सहावी ते आठवी वर्गांतील विद्यार्थ्यांमध्ये भागाकार करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २७.६ टक्क्यांहून ४८ टक्क्यांपर्यंत वाढले. दुसरीकडे शेतकरी गटांना प्रोत्साहन देऊन आखलेल्या फळबाग उत्पन्नाच्या योजनांमुळे मागासलेपणातून जिल्ह्याचे एक पाऊल पुढे पडत असल्याचे चित्र अर्थ व सांख्यिकी विभागाने काढलेल्या जिल्हा सामाजिक आणि आर्थिक समालोचन अहवालामध्ये नोंदविण्यात आले आहे.
‘हवा-पाणी-तुळजाभवानी’ या तीन शब्दांत अडकलेल्या विकासाची वाट आता रुंद होऊ लागली आहे. देशातील गरीब जिल्ह्यांतील धाराशिवच्या ठेव आणि कर्जाचे गुणोत्तरही वाढू लागले आहे. नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांतील शिक्षण विभागाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर लक्षात येते की, काही उपक्रम चांगल्या पद्धतीने हाती घेतले. शाळांमध्ये वाचन दिन पाळला जातो. त्या दिवशी मुलांनी वाचायचे आणि काय वाचले हे सांगायचे, असा उपक्रम हाती घेतला होता. निपुण भारतसारख्या उपक्रमांमुळेही मुलांच्या गुणवत्तेमध्ये फरक दिसून येत आहे. पण, ही प्रगती पुरेशी नाही. त्यात आखणी वाढ केली जाणार आहे. गणित आणि भाषा या दोन्ही क्षेत्रात वाढ करण्यासाठी आता पुढील पाच वर्षे आणि पुढील वर्षात काय करायचे, याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे विकास वाटेवर आम्ही पुढे जाऊ.’
पुढील काळात पर्यटन या क्षेत्रात तातडीने पैसा उभा राहू शकतो असे नियोजन आखले जात आहे. तुळजाभवानी मंदिराचा जिर्णोद्धार केला जात आहे. धार्मिक पर्यटनास, पुढील काळात तेर तसेच नळदुर्गच्या किल्ल्यातील पर्यटनास चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार आहे. गेल्या काही वर्षांत धुळे-सोलापूर हा रस्ता कमालीचा चांगला झाल्याने या भागातून मालवाहतूक वाढली आहे. एकेकाळी नुसतेच स्टेशन बांधून ठेवण्यात आले होते. आता रेल्वेची वाहतूकही वाढल्याने मालवाहतुकीचा वेग वाढला आहे.
परिणामी उत्पन्न वाढीत भर पडत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. टेक्निकल टेक्स्टाइल पार्कसारख्या काही योजनाही या जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. सिंचन सुविधांमध्ये वाढ होईपर्यंत छोट्या व्यवसायातून पुढे जाण्याचे नवे प्रारूप विकसित केले जात आहे. अगदी कवड्याची माळ बनविणाऱ्यांना उद्याोगाच्या क्लस्टर योजनेत बसविण्यापासून ते शेतकरी कंपन्यांनी गोदामे करण्यापर्यंत प्रगती केली आहे. गेल्या तीन वर्षांत बिजोत्पादनामध्येही वाढ झाली असल्याचा दावा आहे. हरभरा, सोयाबीन या क्षेत्रात उलाढाल करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. हरभरा आणि सोयाबीनचा भाव स्थिर नसल्याने राजमा उत्पादन वाढविण्यात आले.
उत्पन्नवाढीसाठी शेतीमध्ये नवे प्रयोग
शेतकरी गटाच्या माध्यमांतून जिल्ह्यात बरेच नवे प्रयोग सुरू आहेत. करोनाकाळात शहरातून परतलेल्या शिकलेल्या मुलांनी आता शेती हाती घेतल्याने रोख स्वरूपातील पिके, भाजी याबरोबरच उत्पन्नवाढीचे अनेक प्रयोग आता शेतीमध्ये हाती घेतले जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्याच्या दरडोई निव्वळ उत्पन्नात गेल्या चार वर्षांत एक लाख १८ हजार रुपयांवरून एक लाख ७६ हजार रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ गेली चार वर्षे सतत वाढणारी आहे.
वर्षनिहाय निव्वळ दरडोई उत्पन्न
वर्ष २०१९ – २० – एक लाख १८ हजार ०६२
वर्ष २०२०- २०२१ – एक लाख २६ हजार ४४७
वर्ष २०२१ – २२ – एक लाख ५७ हजार ७३०
वर्ष २०२२ – २३ – एक लाख ७६ हजार ३८२
उत्पन्नवाढीच्या अनेक बाबींवर लक्ष देण्याचे नियोजन केले आहे. तुळजाभवानी मंदिर असल्याने धार्मिक पर्यटन क्षेत्रात बरेच काही करता येईल व त्यातून उत्पन्नवाढीचे नवे मार्ग मिळत जातील. जुन्या उपक्रमांना नव्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आहे. बचत गटातील महिलांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी आता स्वस्त धान्य दुकान हाही एक पर्याय देण्यात आला आहे. -कीर्तिकुमार पुजार, जिल्हाधिकारी, धाराशिव