Dharashiv : राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जलसंपदा विभागाची मोकळी जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात आली आहे. धाराशिवच्या तहसीलदारांंनी ८ हेक्टर ३० गुंठे जागा शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्या ताब्यात दिली आहे. लवकरच या जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उभारणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेली ही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. विद्यार्थी, रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या दृष्टीने ही जागा सोयीची आहे. मात्र काही जणांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पोहनेर रस्त्यावरील खाणीजवळील अडगळीच्या जागेत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत बैठक घेवून तातडीने जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्रत्यार्पित करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने कौशल्य विकास व जलसंपदा विभागाकडून जागेचा ताबा महसूल विभागाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता शिल्पा डोमकुंडवार यांच्याकडे सोपविला आहे. जागा ताब्यात आली आहे. आता या जागेवर सुसज्ज इमारत उभारण्यात येणार आहे. संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून इमारतीच्या उत्कृष्ट आराखड्याची निवड केली जाणार आहे. त्याकरिता ५३० कोटी रुपयांचा सुधारीत प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल करण्यात आला असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…

हेही वाचा – Sanjay Raut : “अजित पवार गुलाबी झालेत, आता म्हणे ते बारामती…”, संजय राऊतांची टोलेबाजी!

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ५ हेक्टर ३० गुंठे जागाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात आली आहे. तुर्तास याच ठिकाणच्या उर्वरित जागेत आयटीआय सुरू राहणार आहे. पुढील काळात राष्ट्रीय महामार्गालगतच असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त जागेत आयटीआय स्थलांतरीत होणार आहे आणि त्यानंतर आयटीआयच्या ठिकाणी वैद्यकीय शाखेशी निगडीत असलेले दंत महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, भौतिकोपचार शास्त्र, फार्मसी यासारखे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहे. एक परिपूर्ण अत्याधुनिक वैद्यकीय संकुल निर्माण करण्याचा आपला मानस असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. जलसंपदा विभागाच्या ३ हेक्टर जागेत वसतिगृह, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharashiv iti and water resource site in possession of medical college a well equipped building will be constructed soon mla ranajagjitsingh patil ssb