रवींद्र केसकर, प्रतिनिधी, धाराशिव
तुळजाभवानी मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने, देवीच्या पादुका, माणिक-मोती, वेगवेगळ्या राजे-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेली ७१ मौल्यवान दुर्मिळ नाणी अद्यापही गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तीन अधिकार्यांसह पाच जणांवर त्रिसदस्यीय समितीने ठपका ठेवला होता. मात्र त्रिसदस्यीय समितीने दोषी ठरविलेल्या पाचजणांपैकी चार जणांना क्लिनचिट देऊन केवळ एकाच व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. सोने-चांदीच्या दागिन्यांचे मोजमाप करताना पुन्हा एकदा तुळजाभवानी मंदिरातील दुर्मीळ मौल्यवान दागिन्यांचा काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे.
हे पण वाचा- आळंदी, देहूवरून निघालेल्या वारकऱ्यांसाठी अपुरी शौचालये, प्रकरण उच्च न्यायालयात
२००१ ते २००५ या कालावधीत काय घडलं?
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात २००१ ते २००५ या कालावधीत सोनं-चांदीच्या मौल्यवान दाग-दागिन्यांना पाय फुटले. तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक राजाभाऊ दिक्षीत यांच्या निधनानंतर कोणतीही कायदेशाीर प्रक्रिया पार न पाडता, त्यांच्या घरून चाव्या आणण्यात आल्या आणि देवीचा जामदारखाना तत्कालीन अधिकार्यांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी तक्रार दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी त्रिसस्यीय समिती नेमली. या समितीने त्यावेळच्या सर्व अधिकार्यांची कसून चौकशी केली आणि सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. या अहवालात प्रशिक्षणार्थी तहसीलदार सी. व्ही. सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार आर. एस. माने, तुळजापूरचे तत्कालीन तहसीलदार सतीश राऊत, मंदिर समितीचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी आणि महंत चिलोजी बुवा यांना दोषी पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी शिफारसही त्रिसदस्यीय समितीने केली होती.
कर्मचाऱ्यांचाच दागिन्यांवर डल्ला
विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेले सोने-चांदी वितळविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सोने वितळविल्यानंतर तब्बल ५५ किलोची तूट कागदोपत्री नोंद करण्यात आली आहे. मागील १३ वर्षांत २०४ किलो सोने आणि ८६१ किलो चांदी भाविकांनी अर्पण केली आहे. ती वितळविण्यापूर्वी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोने-चांदीचे मोजमाप करण्यासाठी समिती गठीत केली होती. या समितीने मागील दोन महिन्यात मंदिरातील पुरातन दागिने, भाविकांनी अर्पण केलेले दागिने आणि महंतांच्या ताब्यात असलेले तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिन्यांचे मोजमाप केले आहे. यावेळी देवीच्या तिजोरीवर मंदिराचा कारभार हाकणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच डल्ला मारल्याचे उघड झाले आहे.
हे पण वाचा- Shravan 2023: सणांचा राजा श्रावण झालाय सुरू, काय आहे महत्व, वाचा
सोनं-चांदीचे मोजमाप करणाऱ्या समितीने आपला अहवाल जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष ओम्बासे यांच्याकडे सादर केला. तो अधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने सादर करण्यात यावा अशी सूचना करून त्यांनी अंतिम अहवाल स्वीकारला नाही. देवीच्या दागिन्यांच्या सात डब्यांपैकी दोन नंबरच्या डब्यातील मौल्यवान शिवकालीन दागिने गायब असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे. आता हे दागिने नेमके कोणत्या कालावधीत गायब झाले, त्याची जबाबदारी कोणाकडे होती अश्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासह समिती पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे.
गायब असलेली दुर्मिळ ऐतिहासिक ७१ नाणी
बिकानेर (४), औरंगजेब (१), डॉलर (६), चित्रकूट उदयपूर संस्थान (३), ज्यूलस (१), शहाआलम इझरा (४), बिबाशूरूक (१), फुलदार (१), दारूल खलीफा (१), फत्तेहैद्राबाद औरंगजेब अलमगीर (१), दोन आणे (२), इंदौर स्टेट सूर्या छाप (१), अकोंट (२), फारोकाबाद (१), लखनऊ (१), पोर्तुगीज (९), इस्माईल शहा (१), बडोदा (२), रसुलइल्ला अकबर व शहाजहान (४), ज्यूलस हैद्राबाद (५), अनद नाणे (२०)
दागिन्यांच्या पेटीची चावी गायब
सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक पदाचा २०१८ साली पदभार हस्तांतरीत करताना सीलबंद अवस्थेत असलेल्या पितळी पेटीची चावीच अधिकार्याकडून हरवली. त्यामुळे पेटीचे कुलूप तोडावे लागले. याच पंचनाम्यात दोन लोखंडी अवजड पेट्या, ज्यांना कुलूप लावलेले नव्हते. त्यात राजे-महाराजांनी दिलेले मौल्यवान दागदागिने उघड्यावर आढळून आले. त्यामुळे तत्कालीन अधिकार्यांचा निष्काळजीपणा त्रिसदस्यीय समितीने ठळकपणे नोंदवला आहे.
उघड्यावर आढळून आलेले दागिने
सोन्याचा मुकुट आतून चांदीचा पत्रा दोरीसह, चांदीचा मुकुट दोरीसह, सोन्याच्या तारा व बारीक सोन्याचा चुरा असलेली लहान डब्बी, चांदीच्या पादुका, एक आरती नग २, सोने चाबुक आतून लोखंडी दोरीसह, लहान डबी त्यामध्ये मातीचा चुरा, सोने बारीक चुरा (वजन केलेले नाही), लहान डबीमध्ये मोतीपवळे व चांदी (वजन केलेले नाही). असं सगळं उघड्यावर आढळून आलं आहे.