धाराशिव – आंब्याच्या रसात म्हणजेच आमरसात झोपेच्या गोळ्या टाकून पतीला आमरसातून गुंगीचे औषध देणार्या पत्नीविरुद्ध तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील महेशकुमार जवाहरलाल चिनगुंडे यांना पत्नी भाग्यवती महेशकुमार चिनगुंडे यांनी २४ मे रोजी सायंकाळच्या जेवणात आमरस दिले. त्यात झोपेच्या गोळ्या टाकल्यास त्याचे महेशकुमार यांना अपाय होवू शकतो, हे माहिती असताना तसेच कोणत्याही डॉक्टरच्या सल्ला किंवा परवानगीशिवाय रसात झोपेच्या गोळ्या टाकल्या. हे आमरस महेशकुमार चिनगुंडे यांच्यासह त्यांच्या घरातील लोकांनीही सेवन केल्याने त्यांना गुंगी येवून दुसर्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोप लागली. तसेच झोपेतून उठल्यानंतर त्यांना शारीरिक वेदना होवू लागल्या. त्यामागील प्रकार समोर आल्यानंतर पती महेशकुमार चिनगुंडे यांनी आपल्या पत्नी भाग्यवतीविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली. त्यानुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात भाग्यवती चिनगुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© The Indian Express (P) Ltd