धाराशिव : कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास ७ जानेवारी २०२५ पासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होत असून ७ जानेवारी रोजी पहाटे मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होऊन ब्राह्मणास अनुष्ठानाची वर्णी देण्यात येईल.
श्री तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव हा धाकटा दसरा म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषतः कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या संख्येने देवीदर्शनासाठी शाकंभरी नवरात्र महोत्सव कालावधीत तुळजापुरात येतात. शारदीय नवरात्र महोत्सवाप्रमाणेच शाकंभरी नवरात्र महोत्सव काळातही तुळजापुरातील पुजारी बांधवांच्या घराघरात स्वच्छता केली जाते. त्याचबरोबर शाकंभरी नवरात्र महोत्सव काळात उपवास केला जातो.
हेही वाचा – Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
यावर्षी शाकंभरी नवरात्र महोत्सवात बुधवार, ८ जानेवारी रोजी देवीची नित्योपचार पूजा व त्यानंतर रथालंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. गुरुवार, ९ जानेवारी रोजी देवीची नित्योपचार पूजा आणि त्यानंतर मुरली अलंकार महापूजा, शुक्रवार १० जानेवारी रोजी शेषशाही अलंकार महापूजा तर शनिवार 11 जानेवारी रोजी सकाळी जलयात्रा काढण्यात येणार आहे. या दिवशी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. रविवार १२ जानेवारी रोजी अग्निस्थापना, शतचंडी यज्ञ आणि देवीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. सोमवार, १३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता घटोत्थापन आणि रात्री छबिना मिरवणूक व जोगवा कार्यक्रमाने नवरात्र महोत्सवातील मुख्य कार्यक्रमाची सांगता होईल. १४ जानेवारी रोजी दुपारी देवीची नित्योपचार पूजा, दुपारी अन्नदान, महाप्रसाद, रात्री छबिना मिरवणूक, संक्रांत पंचांग वाचन होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
शाकंभरी नवरात्र उत्सव कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. नवरात्र महोत्सव काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात असून जिल्हा प्रशासनासह स्थानिक नगर परिषद व इतर विभागांमार्फत नियोजन केले जात आहे