कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उपसा सिंचन योजना क्रमांक २ चे एकूण सहा टप्पे आहेत. त्यातील टप्पा क्रमांक १ ते ५ घाटणे बॅरेज ते रामदरा तलाव ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा व लोहारा या तीन तालुक्यांना मोठा लाभ होणार आहे. या तीन तालुक्यातील एकूण १०८६२ हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. टप्पा क्रमांक ६ मधील कामांना प्राधान्यक्रमात मंजुरी देण्यात यावी आणि ही कामे तातडीने सुरू कारवी अशी आग्रही मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. त्याला जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिरवा कंदील दिला असून मागणी केलेली टप्पा क्र. ६ मधील कामांच्या सर्वेक्षण, संकल्पन व अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही हाती घेण्याबाबत त्यांनी बुधवारी आदेशीत केले आहे. त्यामुळे रामदरा ते बोरी-एकुरगा या टप्पा क्र. ६ मधील पाणी वितरणाच्या कामाला आता वेग येणार असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली.

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा कृष्णा खोरे व गोदावरी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवार १२ फेब्रुवारी रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या आग्रही मागणीवरून आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. कृष्णा खोर्‍यात मराठवाड्याचा ९ टक्के भूभाग आहे. त्यामुळे कृष्णा खोर्‍यातील पाण्यावर मराठवाड्याचा न्याय्य हक्क आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी कृष्णा खोर्‍यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी २००१ साली मंत्रिमंडळात महत्वपूर्ण निर्णयाला मंजुरी मिळवून घेतली. हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसी पाण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी महायुती सरकारने ११ हजार ७२६ कोटी रूपयांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सिंदफळ येथील पंपगृहातून तुळजाभवानी देवीच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात लवकरच दाखल होत आहे. रामदरा येथून हे पाणी बोरी-एकुरगा आणि तेथून बंद पाईपलाईनद्वारे तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यातील शेतशिवारात जाणार असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली आहे.

पाणी वितरणाच्या सर्वेक्षणाचे प्राथमिक काम पूर्ण झाले होते मात्र टप्पा क्रमांक ६ मधील प्राधान्यक्रम मंजूर नसल्याने प्रत्यक्षात अंदाजपत्रकाच्या कामांना सुरुवात करता येत नव्हती. जलसंपदा मंत्री ना. विखे पाटील यांनी आपल्या आग्रही मागणीची दखल घेऊन टप्पा क्रमांक ६ मधील कामांची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. योजनेच्या टप्पा क्र.६ मध्ये अस्तित्वात असलेल्या एकूण ८ साठवण तलाव व नव्याने बांधकाम करण्यात आलेले २ बंधारे जोड कालव्याद्वारे भरणे प्रस्तावित आहे. याद्वारे तुळजापूर तालुक्यातील २,८७४ हेक्टर, उमरगा तालुक्यातील २,०५७ हेक्टर व लोहारा तालुक्यातील २,१४७ हेक्टर असे एकूण ७,०७८ हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. टप्पा क्र.६ मध्ये निर्माण होणारे ७,०७८ हे. सिंचन क्षेत्र हे उपसा सिंचन योजना क्र.२ च्या एकूण प्रकल्पिय १०,८६२ हे. सिंचन क्षेत्राच्या ६५% इतके आहे. या टप्प्यात १ पंपगृह, उर्ध्वगामी नलिका व ८५ किलोमीटर लांबीच्या बंद पाईपलाईन कामाचा समावेश आहे. शाश्वत सिंचनामुळे आता कायम पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांच्या दरडोई उत्पन्नात लक्षवेधी वाढ होवून जीवनमान उंचवण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

असे होणार पाण्याचे वितरण

सिंदफळ येथील पंपगृहातून रामदरा तलावापर्यंतचा पाचवा टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. पुढील पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या तीन तालुक्यांतील साधारणतः सात हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी साधारणपणे ८५ किलोमीटर लांबीची पाईपलाईन अंथरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रामदरा येथील पंपगृहातून उपसा सिंचन पध्दतीने पाणी उचलून बोरी-एकुरगा गावापर्यंत रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला नेले जाणार आहे. तेथून गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून तुळजापूरसह लोहारा आणि उमरगा तालुक्यात पाईपलाईनद्वारे हे पाणी वाटेत येणाऱ्या आठ तलाव आणि दोन बॅरेजेस मध्ये भरून घेतले जाणार आहे. परिणामी खर्चही कमी लागणार आहे.पुढे ते बंद पाईपलाईनद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी देण्याचे प्रस्तवित आहे त्यामुळे सिंचन क्षमतेत ४० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. या दहा स्टोरेज टँकची एकूण क्षमता दोन टीएमसीपेक्षा अधिक असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

Story img Loader