धाराशिव : शिवरायांनी स्वराज्य उभे करण्यासाठी गुजरातमध्ये जाऊन त्यावेळी सुरतेवर छापा टाकला. आता त्या गुजरातचे दोघेजण महाराष्ट्र लुटत आहेत. आपण केवळ रडगाणे गात रहायचं नाही. तुम्ही सरकार उलथून टाका मी आपलं सरकार आल्याबरोबर जाचक कायदे रद्द करतो. शेतकरी आणि व्यापारी वर्ग मोदी सरकारने जीएसटीच्या कचाट्यात पकडले आहेत. हा कर दहशतवाद आपण नष्ट करून टाकणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथे दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ धाराशिव शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार राहुल मोटे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास हुकूमशाही; मला तुरुंगात जावे लागेल, सुशीलकुमार शिंदे यांचा भीतीयुक्त इशारा

सोयाबीनला भाव नाही, कापसाच्या भावाचे वांदे झाले आहेत, तर कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. केवळ निर्यातबंदी केली आहे असे रडगाणे गात बसण्याला अर्थ नाही. निर्यात बंदी मोडून काढायची असेल तर हे सरकार पाडून टाकायला हवे. तुम्ही हे सरकार उलथवून टाका, कांद्याची निर्यात बंदी कायमची दूर करण्याची जबाबदारी माझी आहे. इंडिया आघाडीचे सरकार देशात येणार आहे. घरगड्याप्रमाणे सगळ्या शासकीय यंत्रणा वापरणाऱ्यांना आपण वठणीवर आणल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

नरेंद्र मोदी यांना आपल्याविषयी प्रेम असल्याचे ऐकून आनंद झाला. मलाही त्यांच्याविषयी मनात प्रेम आहे. मात्र ज्यावेळी आपल्यावर शस्त्रक्रिया झाली होती त्यावेळी महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे षडयंत्र करणाऱ्या मोदींच्या चेल्याचपाट्यांना या प्रेमाची जाणीव नव्हती का ? असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

मशाल चिन्ह घेऊन आपण रणांगणात उतरलो आहोत. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन मशालीच्या माध्यमातून दिल्लीचे तक्त जाळून टाकल्याशिवाय आपण स्वस्थ राहणार नाही. नरेंद्र मोदी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांचे कर्ज मान्य करत असतील तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहा यांनी दिलेले वचन मोदींना माहीत नव्हते काय ? असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा – सांगली : उद्याच्या प्रचार सांगतेवेळी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

आज मोदींवर गॅरंटी म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गल्लीबोळात फिरण्याची वेळ आली आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, सर्वांना हक्काचे घर देणार होते तेही खोटे ठरले. त्यामुळे गॅरंटीच्या नावावर खोटे कोण बोलत आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच मी केंद्रातल्या सरकारला मोदी सरकार नव्हे तर गजनी सरकार म्हणून संबोधतो, कारण मागील निवडणुकीत कोणते वचन दिले होते हेही यांना आठवत नाही. गोमूत्रदारी हिंदुत्व, बुरसटलेले हिंदुत्व अंगिकारणारी ही मंडळी यांना आंबेडकरांनी दिलेले संविधान मान्य नाही. त्यामुळेच त्यांचा त्रागा सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणला जात आहे. याद राखा इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर गाठ आमच्याशी आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी यावेळी शासकीय यंत्रणांनाही सज्जड दम दिला.

चाय पे चर्चा करण्याची मोदींना मोठी हौस आहे त्यापेक्षा यंत्रणा वापरून दरोडे घालण्यात मश्गुल असलेल्या केंद्र सरकारने स्वतःच्या कामावर चर्चा करावी. मागील अडीच वर्षात आपण केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रातील जनता आज खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे आणि या निवडणुकीत त्याचा प्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही. मोठ्या मताधिक्याने मशाल चिन्हासमोरील बटन दाबून ओम राजेनिंबाळकर यांना विजयी करा असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharashiv will destroy tax terrorism uddhav thackeray announcement in mahavikas aghadi meeting ssb