सोलापूर : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने सोलापूर शहरात स्वच्छतेची मोहीम राबविली. ४४८६ श्री सदस्यांच्या सहभागातून झालेल्या या स्वच्छता मोहिमेत ४६.०४ चौरस किलोमीटर क्षेत्रातून सुमारे २०० टन कचरा उचलण्यात आला आणि अवघ्या अडीच तासांत परिसर चकाचक झाला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी औपचारिकपणे या मोहिमेचा शुभारंभ केला. विविध १४ रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून ६७ टन ४५० किलो ओला कचरा आणि १३१ टन ४५० किलो सुका कचरा संकलित करण्यात आला.

या स्वच्छता अभियानासाठी प्रतिष्ठानच्या ४४८६ श्री सदस्यांसह ५७ ट्रॅक्टर, ८ डंपर, ७ छोटा हत्तींचा वापर करण्यात आला. तर सोलापूर महापालिकेने ३९ घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या. श्री सदस्यांना स्वच्छतेसाठी लागणारे हातमोजे, मुखपट्टी (मास्क), कराटे, झाडू, टोपली, तळवटे, खोरे इत्यादी सामुग्रीसह संपूर्ण व्यवस्था धर्माधिकारी प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिली होती. विजापूर रस्त्यावरील संभाजी तलाव परिसरातील स्वच्छता मोहिमेत सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश उमेश देवर्षी यांनीही सहभाग घेतला होता. त्यांच्यासोबत न्यायालयातील वकील मंडळीही या सेवेत सहभागी झाली होती.

उन्हाचे चटके सहन करीत रस्त्यावर उतरून रस्त्यावरील कोपरा ना कोपरा स्वच्छ करण्यासाठी हाती झाडू, खराटा घेऊन उतरलेल्या श्री सदस्यांसाठी पिण्याकरिता पाण्याचे चार टँकरची सोय करण्यात आली होती.

Story img Loader