Dharmaveer 2 Trailer Launch : “मलादेखील एक सिनेमा काढायचा आहे. मी जेव्हा सिनेमा काढेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्य वेळ आली की, निश्चितच मी सिनेमा काढणार”, असे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून म्हणाले की, आताच्या घडामोडींपर्यंत सिनेमा आला असेल तर माझे पात्र त्यात आहे का? यावर शिंदे म्हणाले की, तुमचे पात्र ‘धर्मवीर ३’ मध्ये आहे. यानंतर फडणवीस यांनी स्वतःचा सिनेमा काढायचा असल्याची इच्छा बोलून दाखवली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “धर्मवीर सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिला, त्यांना या सिनेमाने चेतवले. सिनेमा ज्यावेळी प्रदर्शित झाला, तेव्हा याचा भाग दोन येईल, हे कुणाला माहीत नव्हते. चित्रपटाबरोबरच शिंदे यांच्या जीवनाचा भाग दोन येईल, याचीही कुणाला कल्पना नव्हती. पण तोही भाग दोन लवकरच सुरू झाला. दिघे यांच्या शिकवणुकीप्रमाणे शिंदे यांनी ज्याप्रकारे आज महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. ते पाहता आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती.”

हे वाचा >> ‘कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, धर्मवीरच्या ट्रेलरमधून राजकीय टोला

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरूचे माहात्म्य सांगणाऱ्या ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ या चित्रपटाचा ट्रेलर वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित समारंभात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मंगलप्रभात लोढा, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार, खासदार श्रीकांत शिंदे, अभिनेता सलमान खान, जितेंद्र, महेश कोठारे, अशोक सराफ, गोविंदा आदी उपस्थित होते. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रसिद्ध होणार आहे.

येत्या ९ ऑगस्टला ‘धर्मवीर – २’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेतून आपल्या भेटीस येणार आहे.

एकनाथ शिंदेंचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले

“विचारांशी गद्दारी झाली म्हणून एकनाथ शिंदे सरकार सोडून बाहेर आले. पण दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवले गेले. पण ज्यावेळी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीशी असते, तेव्हा कितीही हिणवले गेले, तरीदेखील खरे सोने काय आहे, हे महाराष्ट्राची जनता हेरते आणि शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

धर्मवीर ३ आणि ४ ची तयारी सुरू करा

“धर्मवीर ही सत्यकथा आहे. एक व्यक्ती सामान्यातून असामान्य कसा होतो आणि अनेक लोकांना असामान्य कसा बनवतो, हे दिघे साहेबांच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळते. यासाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. तरडे यांनी आतापासूनच धर्मवीर ३ आणि ४ ची तयारी सुरू करावी. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे, तो पुढचे १५-२० वर्ष तरी थांबणार नाही. हा मला विश्वास आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.