Anand Dighe Death Controversy : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील काही दृष्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. या वादांवर बोलताना एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केला आहे. आनंद दिघे यांची हत्या झाली होती, हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतो, असं ते म्हणालेत. यावरून आता पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेत हे भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद दिघेंना खांद्यावर घेऊन खरंच एकनाथ शिंदे गेले होते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, त्यावेळची परिस्थितीतीच ती होती. आनंद दिघेंना मारलं गेलंय, हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतोय. दुपारी आनंद दिघेंना डिस्चार्ज देण्यात येणार होता. पण अचानक त्यांचं निधन झालं. बोलता चालता निधन झालं? या सर्व गोष्टी कालांतराने समोर येतील. त्या हॉस्पिटलला आग लागली होती. रुग्णालयात असंख्य रुग्ण होते. त्या सर्वांना वाचवायचं काम शिवसैनिकांनी केलं. त्यात एकनाथ शिंदे अग्रस्थानी होते. एवढाच त्या दृष्याचा अर्थ आहे. पण एकनाथ शिंदे हायलाईट झाले की हे लोक हायपर होतात.”

हेही वाचा >> ‘धर्मवीर २’ ची दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी; ठरला यंदाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा मराठी सिनेमा

दिघे साहेबांचा घात झालाय

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय शिरसाट म्हणाले, “मी दिघेसाहेबांच्या अपघाताच्या दिवसांपासून पाहिलेलं आणि अनुभवलेलं आहे. तिथे मी गेलेलोही आहे. अपघातानंतरची परिस्थिती मी पाहिली आहे. दिघेंच्या डोक्याला मार लागला नव्हता. त्यांना जिथे मार लागला होता त्यामुळे मृत्यू होण्याचं कारण नव्हतं. मग डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना हार्टअटॅक कसा आला? त्यामुळे ठाण्यातील लोक म्हणतात की दिघे साहेबांना मारलं गेलं. दिघे साहेबांचा घात झालाय. आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. त्यांना कोणतं इंजेक्शन दिलं होतं? त्यामुळे हृदयात फुगा तयार झाला आणि अटॅक आला. त्यामुळे हार्टवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. परंतु, त्या काळात या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी होती.”

आनंद दिघेंना कोणी मारलं असेल? असं त्यांना विचारलं असता ते म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. कारण यासंदर्भात माझ्याकडे पुरावे नाहीत. मी कुणावर थेट आरोप करू शकत नाही. साक्षीदार कधीतरी बाहेर येतील.”

हेही वाचा >> Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया म्हणाले; “माझी तयारी आहे की…”

पुतण्या केदार दिघे यांचं प्रत्युत्तर

आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे म्हणाले, “संजय शिरसाट २३ वर्षे काय करत होते? तुम्ही आज म्हणताय की दिघेसाहेबांचा घात झाला आणि संपूर्ण ठाण्याला माहितेय. याचा अर्थ तुम्हा नेत्यांना पहिलं माहिती असेल. मग तुम्ही तोंडं गप्प करून का बसला होतात? तुमचा स्वार्थ काय होता? ज्यामुळे तुम्ही शांत होतात. मी आजही सांगतो, याआधीही सांगितलं आहे आणि यापुढेही सांगेन, या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी देऊन सांगतो की मी दिघे साहेबांना अग्नी दिलाय, दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून कोर्टाची पायरी चढायलाही तयार आहे. पण यासाठी पुरावे घेऊन या.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharmaveer anand dighe was killed know whole thane district alleged by eknath shinde mla sgk