Anand Dighe Death Controversy : “धर्मवीर आनंद दिघे यांना मारलं गेलंय, हे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहितेय”, असं मोठं विधान करून शिंदे गटातील आमदार संंजय शिरसाट यांनी आज पुन्हा एकदा जुन्या वादाला तोंड फोडलं. धर्मवीर २ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील काही दृष्य वादग्रस्त ठरले आहेत. तर, आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे. यावरून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी संजय शिरसाट यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले होते?

“आनंद दिघेंना मारलं गेलंय, हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतोय. दुपारी आनंद दिघेंना डिस्चार्ज देण्यात येणार होता. पण अचानक त्यांचं निधन झालं. बोलता चालता निधन झालं? या सर्व गोष्टी कालांतराने समोर येतील. त्या हॉस्पिटलला आग लागली होती. रुग्णालयात असंख्य रुग्ण होते. त्या सर्वांना वाचवायचं काम शिवसैनिकांनी केलं”, असं आज पत्रकार परिषदेत संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा >> Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंना मारलं गेलंय, हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतोय”, शिंदे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “कोणतं इंजेक्शन…”

केदार दिघेंचं प्रत्युत्तर काय?

संजय शिरसाट यांच्या या विधानावर केदार दिघे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “धर्मवीर १ मध्ये दिघे साहेब शेवटच्या स्टेजला जातात तेव्हा एकनाथ शिंदे दिघे साहेबांना खांद्यावरून घेऊन जातात. मग याचा अर्थ काय होतो? संजय शिरसाटांचा रोख कोणावर आहे?” असा थेट सवालच केदार दिघे यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले, “संजय शिरसाट २३ वर्षे काय करत होते? तुम्ही आज म्हणताय की दिघेसाहेबांचा घात झाला आणि संपूर्ण ठाण्याला माहितेय. याचा अर्थ तुम्हा नेत्यांना पहिलं माहिती असेल. मग तुम्ही तोंडं गप्प करून का बसला होतात? तुमचा स्वार्थ काय होता? ज्यामुळे तुम्ही शांत होतात.

“मी आजही सांगतो, याआधीही सांगितलं आहे आणि यापुढेही सांगेन, या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी देऊन सांगतो की मी दिघे साहेबांना अग्नी दिलाय, दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून कोर्टाची पायरी चढायलाही तयार आहे. पण यासाठी पुरावे घेऊन या. तुम्ही तर्क वितर्क लावायचे, लोकांना संभ्रमात टाकायचं आणि उत्तरं द्यायची नाही. वेळ आली की उत्तरे देऊ म्हणता. असेल हिंमत तर द्या उत्तरे. आज माझी तयारी आहे की दिघेसाहेबांबत काही चुकीचं घडलं असेल तर सगळं राजकारण सोडून देईन पण दिघे साहेबांना न्याय मागण्यासाठी धावीन”, असंही केदार दिघे म्हणाले.