शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. हा लढा आता सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोगापर्यंत येऊन पोहोचला आहे. असे असताना शिंदे गटाने शिवसेनेमध्ये नव्या नेत्यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते, उपनेते तसेच प्रवक्तेपदाची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर सोपवली आहे. असे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील शिवसेनेत आगामी काळात काही बदल होण्याचे संकेत दिले आहेत. आपण शिवसेनेची पुनर्बांधणी करत आहोत. अनेक महिला तसेच पुरुषांना वेगवेगळी जबाबदारी द्यायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या तसेच प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आमदार, खासदारांनंतर एकनाथ शिंदेंचा मोर्चा ज्येष्ठ नेत्यांकडे? लिलाधर डाके यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

“बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने अनेक सामान्यांना असामान्य केलं. जे लोक असामान्य झाले ते शिवसेनेतून निघून गेले. आता परत एकदा सामान्यातून असामन्य माणसं घडवण्याची वेळ आली आहे. सुषमा अंधारे यांचे मी मनापासून स्वागत करतो,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला सुषमा अंधारे यांचे शिवसेनेत स्वागत गेले.

“नसलेल्या शिवसेनेची (शिंदे गट) पक्षाची गमतीशीर मांडणी सुरु आहे. खऱ्याखुऱ्या शिवसेनेची पुनर्बांधणी आपण सुरु करत आहोत. अनेक महिला तसेच पुरुष कार्यकर्त्यांवर मी जाबादाऱ्या देत आहे. मला ग्रामीण भागातील महिलांनादेखील संधी द्यायची आहे. त्यांच्यावर संघटनेची चांगली जबाबदारी द्यायची आहे. पुरुषांवरही मी जबाबदारी सोपवतच आहे. रोज चांगल्या नेमणुकी मी करत जाणार आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “पक्षप्रमुख असा उल्लेख न करणे हा कद्रुपणा”; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला

“सध्या सर्वात मोठ्या दोन लढाया सुरु आहेत. यातील एक लढाई ही कायदेशीर आहे. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु असून मला त्यावर बोलायचे नाही. पण अनेक घटनातज्ज्ञांनी आपली मतं मांडली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असेल तो फक्त शिवसेनेच्या भवितव्याबद्दलचा निकाल नसेल. तर देशात लोकशाही किती काळ जिवंत राहणार आहे, याबद्दलचा हा निर्णय असेल,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> मंत्रीमंडळ विस्तारावरून फडणवीसांचे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद? अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले…

“पुरोगामी आणि प्रतिगामी शब्दात फरक काय आहे. पुरोगामी म्हणणारे खरंच पुरोगामी आणि स्वत:ला प्रतिगामी म्हणणारे खरंच प्रतिगामी आहेत का? संवैधानिक लढाई खूप महत्त्वाची आहे. देशातील लोकशाही वाचवणे खूप महत्त्वाचे आहे. लोकशाहीच राहिली नाही तर सर्वांनाच हे पुरून टाकतील,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भारतीय संविधानाचे रक्षण व्हायला हवे, अशी इच्छा व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhav thackeray soon will appoint new people to reform shivsena prd