सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोलापुरात असतानाच पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मनमानीला कंटाळून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष नसून, शिंदे काँग्रेस असल्याचा आरोप मोहिते-पाटील यांनी राजीनामा पत्रात केला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना पाठविलेल्या सहा पानी राजीनामा पत्रात धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या पक्षविरोधी कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा…शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या असलेले धवलसिंह मोहिते-पाटील हे त्यांच्यापासून राजकीय आणि कौटुंबिकदृष्ट्या दूर आहेत. अकलूजच्या राजकारणात चुलत्याच्या विरोधात भूमिका घेणारे धवलसिंह मोहिते-पाटील हे गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत. सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट एवढ्याच भागात काँग्रेसचे अस्तित्व असून, उर्वरित बहुतांश भागात पक्षाचे अस्तित्व दिसत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत आपण जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार घेऊन प्रामाणिकपणे पक्षबांधणीचे काम केले. परंतु सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मनमानीमुळे पक्षाची ताकद आणखी घटली आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अमर रतिकांत पाटील हे अधिकृत उमेदवार असताना सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, पक्षाचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष हरीश पाटील आणि इतरांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा सक्रिय प्रचार केला.
हेही वाचा…उत्तर महाराष्ट्र गारठला, मध्य महाराष्ट्रातील पारा खाली
यात काडादी यांना अनामत रक्कमही वाचविता आली नाही. त्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी झाली. काँग्रेस पक्षाने आम्हाला धोका दिला, अशी बदनामीदेखील झाली. त्यामुळे मतदारांमध्ये आक्रोश निर्माण झाल्याचेही धवलसिंह मोहिते-पाटील यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रभागातून मताधिक्य मिळाले नसताना विधानसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या आग्रहाने सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत पुन्हा चेतन नरोटे यांनाच उमेदवारी दिली गेली. यापूर्वी प्रणिती शिंदे यांनी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात नरोटे यांचा दारुण पराभव झाला. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. पक्षाचे उमेदवार निवडताना जिल्हाध्यक्ष म्हणून आपणास विश्वासात घेतले गेले नाही. यात केवळ सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांची मनमानी दिसून आली. पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे धवलसिंह मोहिते-पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.