धवलसिंह यांच्याकडे सोलापूर काँग्रेसची धुरा

एजाज हुसेन मुजावर, लोकसत्तासोलापूर : अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धाकटी पाती समजल्या जाणाऱ्या डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना असा प्रवास करून पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेले धवलसिंह यांच्यावर आता अतिशय पडत्या काळात पक्षाला पुन्हा नव्याने उभारी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात काँग्रेसची मजबूत ताकद होती. अक्कलकोटपासून ते करमाळ्यापर्यंत याच पक्षाची चलती असायची. १९७७ साली तत्कालीन जनता पक्षाच्या लाटेतही या जिल्ह्य़ाने काँग्रेसला साथ दिली होती. १९७८ साली शरद पवार यांचा समाजवादी काँग्रेस हा पक्ष अस्तित्वात आला तरी त्याचा धक्का सोलापुरातील काँग्रेसला बसला नव्हता. परंतु पुढे १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मात्र जिल्ह्य़ातील काँग्रेसची ताकद घटत गेली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्हा ग्रामीणमध्ये अनेक वजनदार नेते काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत गेले. तर काहीजण नंतर सोयीनुसार भाजप वा शिवसेनेत गेले. सोलापुरात काँग्रेस पक्षांतर्गत राजकीय तोल सांभाळण्यासाठी शरद पवार यांच्या पुढाकाराने सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यात अलिखित करार घडवून आणला होता. त्यानुसार सुशीलकुमारांनी सोलापूर शहराचे राजकारण पाहायचे आणि विजयसिंहांनी जिल्हा ग्रामीण भाग सांभाळायचा. एकमेकांच्या क्षेत्रात कोणीही हस्तक्षेप करायचा नाही, हे सूत्र अलीकडे राष्ट्रवादीची स्थापना झाली तरीही कायम होते. मात्र २००३ सालचा आपवाद ठरला. त्यावेळी सुशीलकुमार आणि विजयसिंह हे दोघेही एकाच सोलापूर जिल्ह्य़ातील नेत्यांकडे अनुक्रमे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद आले खरे; मात्र त्याचवेळी सुशीलकुमारांनी सोलापूरची खासदारकी सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विजयसिंह यांचे धाकटे बंधू प्रतापसिंह हे भाजपच्या चिन्हावर काँग्रेसचा पराभव करून निवडून आले. तेव्हा काँग्रेसला पहिला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर पुढे २००४ च्या लोकसभा निवडणुकीत तर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिली. तरीही त्यांचा पराभव करून भाजपचे सुभाष देशमुख निवडून आले होते.

संघटना कमकुवत

सोलापूरमध्ये काँग्रेस पक्ष अधिक भक्कम करणे सुशीलकु मार शिंदे यांना सहज शक्य होते. केंद्रात गृहमंत्रीपद, ऊर्जामंत्री, लोकसभेतील पक्षनेता, राज्याचे मुख्यमंत्री, अनेक वर्षे अर्थमंत्री, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी अशी एक ना अनेक जबाबदारी उचललेल्या सुशीलकुमारांना जिल्ह्य़ात अपेक्षित बांधणी करता आली नाही, ही सामान्य पक्षकार्यकर्त्यांची खंत आहे. या पाश्र्वभूमीवर आता धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यावर पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आली आहे. सहकारमंत्री शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू आणि दिवंगत माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र असलेले धवलसिंह हे कुस्त्यांचे मैदान मारणारे कसलेले मल्ल आणि उत्तम क्रीडा संघटक आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत.

सोलापूर आणि मोहिते-पाटील हे वेगळे समीकरण आहे. चुलते रणजितसिंह आता भाजपचे आमदार आहेत.