धर्मवीर सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर लाँच सोहळा काल रविवारी (२० जुलै) पार पडला. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधून उद्धव ठाकरे यांना अनेक टोले लगावण्यात आले असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावरुन आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. “आनंद दिघे यांना सर्वांत जास्त आम्ही ओळखतो. आजकाल आनंद दिघेंवर काहीजण स्वत:ची मालकी दाखवत आहेत.” असं म्हणून संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Dhramveer 2: “मी जेव्हा सिनेमा काढेल तेव्हा…”, ‘धर्मवीर २’ ट्रेलर लाँच करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले…

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, “आनंद दिघेंवर सध्या काहीजण मालकी हक्क दाखवून त्यांच्यावर सिनेमा आणि नाटकं काढत आहेत. पण आनंद दिघेंच्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना आणि मते होती हे आम्हाला चांगलंच माहित आहे. आम्ही जर त्यावर सिनेमे काढले तर तोंड लपवून फिरावं लागेल.” पुढे संजय राऊत म्हणाले की, “आज गुरुपोर्णिमा आहे; त्यामुळे बाळासाहेबांनी सांगितलंय की, सत्य बोला आणि इमानानं जगा. जर बेईमान लोक आनंद दिघेंना गुरू मानून त्यांचे खोटे चित्र समोर आणत असतील तर तो आनंद दिघेंचा अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरू बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे.”

“दिघेंच्या तोंडी वाक्यं घालून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न”

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “चित्रपटामध्ये आनंद दिघे यांच्या तोंडी काही वाक्ये घालून तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न कराल; पण भविष्यात तुम्हीसुद्धा या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिलेला आहे. दिघेंच्या नावाखाली खोट्या गोष्टी पसरवणं, हे चुकीचं आहे. आनंद दिघे आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व वेगळं नव्हतं. बाळासाहेबांचे हिंदुत्वच आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं. ठाण्यात काही याहून वेगळं हिंदुत्व नव्हतं.”

हेही वाचा : चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार! दोघांनी चित्रिकरण करुन व्हिडीओ इन्स्टाग्रामवर केला व्हायरल

“बोगस आणि भंपक चित्रपट”

पुढे संजय राऊत म्हणाले की, “हिंदुत्वाच्या ज्या काही वेगळ्या चुली मांडण्यात आल्या आहेत; त्या आनंद दिघेंनीही कधी मान्य केल्या नसत्या. हे चित्रपट बोगस आणि भंपक आहेत. आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशाप्रकारचे चित्रपट याआधीही अनेक आले आहेत. काश्मीर फाईल्स भाजपाच्या लोकांनी निर्माण केलेत. आपल्या खोट्या भूमिकांना सत्याचा मुलामा देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला गेला आहे. हे सर्व चुकीचे आहे,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले की, “जे असत्य आहे त्याची चिंता आपण का करायची? पहिल्या चित्रपटात आनंद दिघेंचा महानिर्वाण दाखवला असताना त्यानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभा निवडणुका असल्यामुळे खोट्याला उजाळा द्यायचा देण्यासाठी हे सर्व सुरु आहे. आनंद दिघेंसारखे महान निष्ठावान शिवसैनिकाचा, शिवसेना नेत्याचा वापर करणे सुरु आहे.” असेही ते म्हणाले.

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ट्रेलर लाँच

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरूचे माहात्म्य सांगणाऱ्या ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ या चित्रपटाचा ट्रेलर वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित समारंभात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मंगलप्रभात लोढा, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार, खासदार श्रीकांत शिंदे, अभिनेता सलमान खान, जितेंद्र, महेश कोठारे, अशोक सराफ, गोविंदा आदी उपस्थित होते. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रसिद्ध होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhramveer 2 sanjay raut anand dighe cm ekanath shinde vsh