धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या ५४ कोटी रुपयांची थकबाकी त्वरित भरावी म्हणून जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शिरपूर तालुक्यातील तांडे येथे प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीसमोरच ठिय्या दिला. गिरणीचे कार्यकारी संचालक एफ. डी. पाटील यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जफेड करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, बँकेला ५० कोटींचे भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आता बँकेचे आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जालना आणि धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकांना ७१.९ कोटी रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेण्याच्या दोन दिवस आधीच धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेचे उपाध्यक्ष आ. अमरीश पटेल यांच्या राजकीय आधिपत्याखाली कारभार असलेल्या प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीसमोर ठिय्या दिला. सूत गिरणीला बँकेतून कर्ज स्वरूपात ५४ कोटी रुपये देण्यात आले होते. या कर्जाची थकबाकी फेडण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. थकीत कर्जफेड करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांच्या शिष्टमंडळाला गिरणीचे कार्यकारी संचालक पाटील यांनी दिले. बँकेला भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला. यामुळे आर्थिक अडचणीमुळे संकटात सापडलेल्या धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेला दिलासा मिळणार आहे.

Story img Loader