महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत मागील पाच वर्षांत धुळे जिल्ह्यातील एकूण १९१ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली आहेत. या जिल्ह्यातील एकाही गावाची आजपर्यंत विशेष पुरस्कारासाठी निवड होऊ शकलेली नाही. जिल्ह्यातील तंटामुक्तीसाठी पात्र ठरलेल्या गावांची संख्या लक्षात घेतल्यास अद्याप ३६० गावे तंटामुक्त होणे बाकी असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. तंटामुक्त गाव मोहिमेचे २०१२-१३ हे सहावे वर्ष. मागील पाच वर्षांतील धुळे जिल्ह्याच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास सुमारे ३५ टक्के गावे तंटामुक्त झाल्याचे लक्षात येते. ज्या वर्षी या मोहिमेचा शुभारंभ झाला, म्हणजे २००७-०८ मध्ये या जिल्ह्यातील ३१ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली, तर एकाही गावाची विशेष पुरस्कारासाठी निवड झाली नाही. त्यानंतर २००८-०९ मध्ये धुळ्याची कामगिरी खाली घसरली. तेव्हा केवळ २७ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली. मोहिमेच्या तिसऱ्या वर्षांत म्हणजे २००९-१० मध्ये धुळ्यातील ४२ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली. त्या वेळी एकाही गावास शांतता पुरस्कार मिळाला नाही. २०१०-११ या चवथ्या वर्षांत धुळ्याच्या कामगिरीचा आलेख पुन्हा खाली गेला. या वर्षांत केवळ १९ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली. तेव्हादेखील एकही गाव विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरले नाही. २०११-१२ या पाचव्या वर्षांत धुळ्याच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली. ७२ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली. पाच वर्षांत केवळ याच वर्षांत सर्वाधिक गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली. या जिल्ह्यातील एकही गाव संपूर्ण पाच वर्षांत विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरले नसल्याचे गृह विभागाच्या अहवालावरून दिसून येते.
आजवरच्या कामगिरीवर नजर टाकल्यास धुळे जिल्ह्यात मोहिमेत सहभागी होणाऱ्या ५५१ गावांपैकी १९१ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यावरून अद्याप ३६० गावे तंटामुक्त होणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा