धुळ्याच्या साक्री तालुक्यातील शेतकरी निसार शेख यांनी तुर्कस्थानातून बियाणे आयात करत बाजरीचे यशस्वी उत्पादन केले आहे. हे बाजरीचे पीक १२ फूट उंचीपर्यंत वाढत असून त्याला लागलेले कणीस तब्बल चार फूट लांब आहे. भाकरी करण्यासाठी ही बाजरी चांगली असून तिची चवदेखील उत्तम आहे, असे निसार शेख यांनी सांगितले.
हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा राजकीय गेम केला”, मनोहर जोशींचे नाव घेत शिंदे गटातील आमदाराचे गंभीर आरोप
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील शेतकरी निसार शेख यांची चिकसे शिवारात शेती आहे. यावर्षी त्यांनी शेतात बाजरीचे उत्पादन घेतले. विशेष म्हणजे बाजरीच्या पेरणीसाठी शेख यांनी चक्क तुर्कस्थानातून बियाणे मागवले. यासाठी प्रतिकिलो हजार रुपये खर्च त्यांना बियाण्यासाठी आला. शेख यांनी शेतात तुर्की बाजरीची पेरणी केली. शिवाय बाजरीचे यशस्वी उत्पादन घेतले.
याविषयी बोलताना निसार शेख म्हणाले, “बाजरी पेरताना प्रति एकर सव्वा किलो बियाणे पेरणीसाठी लागले. साधारण बाजरी प्रमाणेच इतर मशागतीची कामे व खते या बाजरीच्या पिकासाठी करावी लागतात. तुर्की बाजरीचे उत्पादन प्रति एकर ६० क्विंटलपर्यंत येते. प्रथमच तुर्की बाजरीची पेरणी धुळे जिल्ह्यात होत असल्याने यापूर्वी अशा वाणाच्या पेरणीचा अनुभव नव्हता”
“तुर्कस्तानातील बाजरीची चव आपल्या गावठी बाजरी प्रमाणेच आहे. शिवाय ती आरोग्यवर्धकही आहे. बाजरीच्या या वाणास मोठे दाणे आहेत. स्थानिक बाजारपेठ जिथे उपलब्ध आहे, तिथे ही बाजरी विक्री करता येऊ शकते”, असेही ते म्हणाले.